पाटण : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा ५२ वा गळीत हंगाम आज चेअरमन यशराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात सुरू झाला. यंदा कारखान्यास गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रति मेट्रिक टन 3000 रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय यशराज देसाई यांनी जाहीर केला.
या गाळप हंगामाच्या शुभारंभासाठी पर्यटन व पालकमंत्री शंभूराज देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, ‘लोकनेते बाळासाहेब देसाई व कै. शिवाजीराव देसाई यांच्या प्रेरणेतून हा कारखाना सक्षमपणे उभा आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या भागभांडवलामुळे विस्तारवाढ पूर्ण झाली असून भविष्यातही शासनाचे सहकार्य कायम राहील. संचालक मंडळाने अन्यत्र जाणाऱ्या ऊसाला आळा घालून आपल्या कारखान्याला पुरेसा ऊस मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.’’
यशराज देसाई म्हणाले, ‘‘अवकाळी पावसामुळे ऊसाचे नुकसान झाले असले तरी सभासद शेतकऱ्यांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आर्थिक ताण सहन करत कारखान्यास गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रति मे. टन 3000 रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस विकास विभागामार्फत ऊस बियाणे, खते, तोडणी मजूर टोळ्या आणि यंत्रणा यांचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच पूर्ण क्षमतेने गाळप सुरू होईल. कारखाना लहान असला तरी दर देण्याबाबतीत जिल्ह्यातील मोठ्या कारखान्यांप्रमाणे निर्णय घेतला आहे.’’ सभासदांनी आपला ऊस कारखान्यास द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जयराज देसाई, पांडुरंग नलवडे, सोमनाथ खामकर, प्रशांत पाटील, शशिकांत निकम, सर्जेराव जाधव, सुनील पानस्कर, बळीराम साळुंखे, जयवंतराव शेलार, अभिजित पाटील, संजय देशमुख, प्रकाशराव जाधव, कार्यकारी संचालक सुहास देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ११ ज्येष्ठ ऊस उत्पादक सभासदांच्या हस्ते ऊसाची मोळी गव्हाणीमध्ये टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. कारखान्याच्या संचालिका सौ. दीपाली विश्वास पाटील व श्री. विश्वास आत्माराम पाटील यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा झाली.