सातारा : जनता सहकारी बँक लि., साताराचे सभासद वैभव विजय राऊत रा. सातारारोड यांना 'टाटा सिग्ना हैवा' या व्यावसायिक गाडीचे वितरण बँकेचे भागधारक पॅनेल प्रमुख, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते, चेअरमन अमोल मोहिते, जिल्हा उपनिबंधक कार्यालयामधील वरिष्ठ अधिकारी जनार्दन शिंदे, संजय जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यांत आले.
यावेळी बोलताना अमोल मोहिते यांनी सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी व सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक असलेली जनता सहकारी बँक जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या, व्यवसाय वाढ करणाऱ्या तरुण व होतकरू व्यावसायिक युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. स्वमालकीच्या व्यावसायिक वाहनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी. या उद्देशाने संचालक मंडळाने ठरविलेल्या ध्येय धोरणानुसार अल्प व्याजदराने व्यावसायिक वाहन कर्ज वितरण सुरु असल्याची माहिती दिली.
यावेळी विनोद कुलकर्णी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना नॉन परफॉर्मिंग असेट (एनपीए) संकल्पना लागू केल्यापासून जनता बँकेने प्रथमच निव्वळ एनपीएचे प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश मिळवले असल्याचे तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया व सहकार खात्याच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व तरतुदी करून बँकेस २ कोटी २१ लाख इतका ऑडिट पूर्व ढोबळ नफा झाला असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे बँकेने सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार यांचे सहकार्याने चांगले कामकाज करून प्रगती साधली असल्याचे नमूद करून बँक आर्थिक व तांत्रिकदृष्ट्यादेखील अधिक सक्षम झाली असल्याचे नमूद करून बँकेच्या सभासदांसाठी कॅश क्रेडीट कर्ज तारणी ९.५० टक्के व सामान्य कर्जतारणी १०.०० टक्के या विशेष अल्प व्याजदराच्या कर्ज योजना सुरु असून त्याचा जास्तीत जास्त सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
याप्रसंगी जनार्दन शिंदे, सहाय्यक निबंधक (परसेवा), सहकारी संस्था, सातारा यांनी बँकेचे जेष्ठ संचालक विनोद कुलकर्णी, चेअरमन अमोल मोहिते, सर्व संचालक मंडळ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या अधिकारी व सेवकांनी चांगले कामकाज करून बँकेची प्रगती साधली असल्याचे नमूद केले. वैभव विजय राऊत यांनी बँकेकडून वाहन कर्ज त्वरित वितरीत केल्याबद्दल सर्व संचालक सदस्य, अधिकारी व सेवक वर्ग यांना सहकार्याबद्दल धन्यवाद देवून बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमास बँकेचे सेवक संचालक नीळकंठ सुर्ले, अधिकारी महेंद्र पुराणिक, संजय काटकर, सौ. आशा जगदाळे, सौ. सरीता कुंजीर, श्री. राजेंद्र साळुंखे, बँकेचे अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता.