मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांच्या ५०० मीटर परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंक विक्री करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे अन्न आणि प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत बोलताना याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की शाळांच्या ५०० मीटर परिसरात स्टिंग विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे.
सरकारने हा निर्णय मुले आणि तरूण या ड्रिंक्सच्या आहारी जात असल्याने त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून घेतला आहे. संबंधित आदेश हा याबाबतच्या विभागांना लवकरच पाठवण्यात येणार आहे. या नियमाचे पालन होत आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी करडी नजर ठेवली जाईल.
महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. यावेळी आज आमदार विक्रम पाचपुते यांनी याबाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी 'सभापती नार्वेकर यांना स्टिंगचे सॅम्पल दाखवून यात कॅफेन, टोरेन आणि शुरगचे प्रमाण हे जरी नियमात बसणारं असलं तरी या सर्वाचे कॉम्बिनेशन हे डेडली आहे. याचे मुलांना व्यसन लागते. उत्पादक स्वतः हे मुलांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी योग्य नाहीये असं मान्य करतात. हे असं असलं तरी हे सरास शाळांच्या जवळ मिळते. याबाबत मंत्री महोदय कारवाईचे आदेश देणार का असा प्रश्न विचारला होता.'
या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आम्ही प्राथमिक शिक्षक, पालकांना देखील याबाबत शाळांच्या आवारात मुलांना हे व्यसनाधीनतेकडे नेणारे पदार्थ न देण्याचे आवाहन केलं असून शाळांच्या ५०० मीटर परिसरात असे पदार्थ आढळून आले तर कारवाई करण्यात येईल असे निर्देश देण्यात आल्याचे देखील सांगितलं.