सातारा : महायुती सरकारच्या शपथविधीला आता काही तासच उरले असून तब्बल 31 वर्षानंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. सातारा जिल्ह्यातील महायुतीचे आठही आमदार अधिवेशनासाठी नागपूरला रवाना झाले आहेत. मात्र मंत्रीपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन कोणाकोणाला गेला, याविषयीची उत्सुकता अजूनही गुलदस्त्यात आहे. या यादीमध्ये प्रामुख्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे, आमदार शंभूराज, आमदार मकरंद पाटील व आमदार जयकुमार गोरे यांची नावे चर्चेत आहेत. युद्ध पातळीवर या मंत्र्यांचे कार्यकर्ते मुंबईतून नागपूरला रवाना झाले आहेत.
सातार्यातून मंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत होती. भाजपचे सर्वाधिक चार आमदार जिल्ह्यातून निवडून गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन जिल्ह्यात सर्वाधिक आमदार भाजपचे असल्याने भाजपकडे कॅबिनेट मंत्री पद व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्यावे, अशी विनंती केली आहे. या मागणीला फडणवीस कसा प्रतिसाद देतात, याविषयी उत्सुकता आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने मंत्रीपदांची यादी अंतिम केली असून त्याबाबतची पूर्व सूचना राज्यपालांना देण्यात आली आहे. या यादीमध्ये सातारा जिल्ह्यातील सातार्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शिवसेना शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई, माण-खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी अजित दादा गटाचे आमदार मकरंद पाटील यांची नावे पुढे येत आहेत. यातील किती जणांना शपथविधीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोन आले, याविषयी अजून रहस्य भेद झालेला नाही. या सर्व हालचाली आता रविवारी नागपूर मध्येच ठरणार आहेत. शिंदे गटाकडून आमदार महेश शिंदे यांनाही धक्का तंत्र म्हणून संधी दिली जाऊ शकते का, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. कराड दक्षिण मध्ये अतुल भोसले यांना ताकद देण्यासाठी त्यांना मंत्रिपद बहाल होणार का? ही पण चर्चा जोर धरत आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी अशा धक्का तंत्रांबाबत एकमेकांशी समन्वयाने चर्चा केली असल्याचे समजते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचाराच्या सभेत कराडमध्ये मंत्रीपद मिळेल, असे संकेत दिले होते. भाजपने जिल्ह्यात हे धक्का तंत्र वापरले तर आश्चर्य वाटायला नको. दुसरे धक्का तंत्र कोरेगाव मध्ये आमदार महेश शिंदे यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला आणि पर्यायाने रामराजे यांना रोखण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांना संधी दिली जाऊ शकते, ही शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही.