सातारा : सातारा हा नैसर्गिक साधनसंपत्तीने परिपूर्ण असलेला जिल्हा म्हणून सर्वमान्य आहे. ठोसेघर धबधबा परिसराची सुरक्षा व्यवस्था ही अतिशय दर्जेदार असून पर्यटकांना मोहवून टाकणारा धबधबा हे वर्षा सहलीसाठी अत्यंत चांगले पर्यटनस्थळ आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
आज दि. 28 रोजी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सपत्निक ठोसेघर धबधब्यास भेट दिली त्यावेळी त्यांनी वरील उद्गार काढले. यावेळी ठोसेघर संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे शंकरअप्पा चव्हाण, जयराम चव्हाण, व्यवस्थापक प्रवीण चव्हाण आदींची उपस्थिती होती. यावेळी पाटील दाम्पत्याचा शंकरअप्पा चव्हाण आणि जयराम चव्हाण यांच्या हस्ते शाल, बुके, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
ठोसेघर भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी धबधब्यासह तेथील सुरक्षा व्यवस्थेची माहिती व्यवस्थापक प्रवीण चव्हाण यांच्याकडून घेतली. तसेच पाहणीही केली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, ठोसेघर संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडून धबधबा परिसरात अतिशय सुंदररित्या सुशोभिकरण करण्यात आले आहे. या पर्यटनस्थळाची सुरक्षा व्यवस्था निश्चितच कौतुकास पात्र आहे. येथे येणार्या महिला पर्यटकांसाठी तयार करण्यात आलेली चेंजिंग रुम, टॉयलेट-बाथरुम, अबालवृद्धांच्या विश्रांतीसाठी असलेला प्रशस्त हॉल, हॉलमध्ये आजूबाजूच्या परिसराची माहिती सांगणारी चित्रफित, भित्तीचित्रे, ठिकठिकाणी गस्त घालत असलेले गार्डस्, सुरक्षेस्तव उभारण्यात आलेले कुंपण, प्रेक्षक गॅलरी हे पर्यटकांना नक्कीच याठिकाणी पुन्हा-पुन्हा येण्यास भाग पाडतील.