क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णांच्या क्रांतिकारक उडीचा शौर्य दिन सातारा येथे साजरा करण्यात येणार

by Team Satara Today | published on : 09 September 2024


सातारा : भारत मातेचे सुपूत्र पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांनी ब्रिटीशांच्या विरुध्द केलेल्या अनेक आंदोलनापैकी एक रोमहर्षक प्रसंग रविवार दिनांक 10 सप्टेंबर 1944 रोजी सातारा येथे घडला. या घटनेस 80 वर्षे पुर्ण होत आहेत. 
ब्रिटीशांच्या विरुध्द स्वातंत्र्य सैनिकांनी डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र क्रांती केली होती. या क्रांतिमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आदर्शाने सशस्त्र सेना उभी केली. महात्मा गांधीच्या 1942 साली करा किंवा मरा, या विचाराने प्रेरणा घेऊन डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांनी देश स्वतंत्र होईपर्यंत स्वातंत्र्य चळवळ चालू ठेवली. यामध्ये डॉ.नागनाथअण्णांना ब्रिटींश पोलिसांनी 28 जुलै 1944 रोजी वाळवा येथे अटक करुन सातारा मध्यवर्ती कारागृहात बंदीस्त केले होते. अण्णा हा अभेद्य तुरुंग फोडून 18 फुट उंचीच्या जेलच्या तटावरुन उडी मारुन भूमिगत झाले. या घटनेने ब्रिटीश सत्तेला हादरा बसला होता.
हा प्रसंग स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे वारसदार आज सातारा येथे दरवर्षी शौर्यदिन म्हणून साजरा करतात. यावर्षी मंगळवार दि. 10 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये या कारागृहात ज्यांनी बंदीवास भोगला, त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ जो स्तंभ उभा केला आहे त्या ठिकाणी अण्णांच्या विचारांवर प्रेम करणारे सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित रहातात. हा कार्यक्रम पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी स्मारक समितीच्या वतीने घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमामधून आजच्या तरुण पिढीला देशासाठी सर्वस्वी त्याग करण्याची व देश सेवा करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी व आपला देश अधिक बलवान होण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज ओळखून डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचाराने प्रेरीत झालेले सर्वजण एकत्रित येऊन आपले कर्तव्य म्हणून दरवर्षी सातारा येथील स्तंभास पुष्पाजंली वाहून अनेक मान्यवर आपले विचार प्रकट करतात. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन निमंत्रक वैभव नायकवडी यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाऊसाहेब कादबाने यांचे अल्पशा आजाराने निधन 
पुढील बातमी
सोनपावलांनी उद्या गौराई येणार घरी

संबंधित बातम्या