दहिवडीत नगरपंचायतीच्या आरोग्य सभापतींचं घर फोडलं; ११ तोळे सोने, अर्धा किलो चांदीसह लाखोंची रोकड लंपास

by Team Satara Today | published on : 18 July 2026


दहिवडी : येथील नगरपंचायतीचे आरोग्य सभापती सुरेंद्र मोरे यांच्या बंगल्यात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी केली. बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी बेडरूममधील दोन लहान तिजोऱ्या पळवून नेल्या. या तिजोऱ्यांमधील तीन लाख ४१ हजार ९०० रुपयांची रोकड आणि अकरा तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदीचे दागिने, दोन स्मार्ट वॉच व कागदपत्रे असा एकूण आठ लाख ९२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. 

याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दहिवडी येथील मोरेमळा (मायणी रस्ता) येथे सुरेंद्र मोरे हे आपल्या कुटुंबासह सीताराम पॅलेस या बंगल्यात राहतात. काल रात्री नेहमीप्रमाणे घरातील सर्व सदस्य जेवण करून वेगवेगळ्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेले होते.

आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सुरेंद्र मोरे यांचे लहान भाऊ आनंदराव यांनी त्यांना उठवले आणि तळमजल्यावरील खोल्यांचे दरवाजे उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले. त्यानंतर सर्वांनी मिळून घराची पाहणी केली असता सुरेंद्र मोरे यांच्या आणि त्यांचा मुलगा आदित्य यांच्या बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते.

दोन्ही बेडरूममधील दोन लहान तिजोऱ्या जागेवर नसल्याचे दिसून आले. बंगल्याच्या दक्षिण बाजूकडील लोखंडी दरवाजाचे कुलूप अज्ञाताने हत्याराने तोडलेले त्यांना आढळले. घराबाहेर शोध घेतला असता बंगल्याच्या दक्षिण बाजूला काही अंतरावर या दोन्ही तिजोऱ्या फोडलेल्या अवस्थेत रिकाम्या मिळून आल्या. चोरट्यांनी दोन्ही तिजोऱ्यांमधून रोख रक्कम ३ लाख ४१ हजार ९०० रुपये, ५० ग्रॅम वजनाची गोल कड्याची सोन्याची साखळी, ४३ ग्रॅम वजनाचे त्रिकोणी आकाराचे सोन्याचे पेंडंट असलेले दुपदरी मंगळसूत्र, दोन ग्रॅमची सोन्याची बाळी, ४०० ग्रॅम वजनाच्या आठ लहान-मोठ्या गणपतीच्या आणि तीन लक्ष्मी देवीच्या मूर्ती, ११० ग्रॅम वजनाचे लहान मुलांचे पैंजण, मनगट्या, करदुडे व बिंदल्या, १७ ग्रॅम वजनाचे मुलांचे दागिने (२० सोन्याच्या अंगठ्या, ४ कानातील डुले, १ जोड मनगट्या आणि ४ सोन्याचे बदाम), दोन स्मार्ट वॉच आणि मेडिकलची लायसन्स व कागदपत्रे असा मुद्देमाल चोरून नेला आहे.

या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कोरेगावच्या पोलिस उपअधीक्षक राजश्री तेरणे व म्हसवडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोपणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरीचे गांभीर्य ओळखून श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी परिसरात कसून तपास केला. भरवस्तीत असणाऱ्या घरावर पाळत ठेवून ही चोरी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या चोरीमुळे दहिवडी परिसरात खळबळ उडाली असून, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दहिवडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऐतिहासिक यश, भारताचं पहिलं खाजगी रॉकेट विक्रम-१ चं यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिनंदन
पुढील बातमी
लोकशाही रणांगणातील लढवय्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना 57 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

संबंधित बातम्या