सातारा : मार्डी (ता. माण) येथील काळेवस्तीजवळ विजेच्या तुटून पडलेल्या तारेला अडकलेल्या शेळीचा जीव वाचवण्यासाठी धावलेल्या तेरा वर्षीय नातवाचा आणि त्याला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या आजीचाही विजेच्या भीषण धक्क्याने जागीच मृत्यू झाला. सौ. मालन विलास काळे (वय-६०) व सुजित युवराज काळे (वय-१३) अशी मृतांची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. मालन काळे या आपल्या नातवासह शेळ्या चारण्यासाठी काळेवस्ती व शिंदेवस्ती जवळच्या बेंद शिवारात गेल्या होत्या. यावेळी एका शेळीचा पाय अनेक दिवसांपासून तुटून पडलेल्या विजेच्या तारेत अडकला. त्या तारेत विद्युत प्रवाह सुरू असल्याने शेळी तडफडू लागली. मुक्या जीवाची ही अवस्था पाहून सुजित तिला सोडवण्यासाठी धावला.मात्र त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसून तो तारेलाच चिकटला.
आपल्या डोळ्यांसमोर नातू मृत्यूशी झुंज देत असल्याचे पाहून मालन काळे यांनी क्षणाचाही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र नियतीने त्यांनाही सोडले नाही. विजेच्या तीव्र धक्क्याने शेळीसह आजी आणि नातवाचा जागीच मृत्यू झाला. काही क्षणांतच आनंदाने शेळ्या चारण्यासाठी गेलेले आजी-नातू कायमचे काळाच्या पडद्याआड गेले.
घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. हातात हात असलेल्या अवस्थेत पडलेले आजी-नातवाचे मृतदेह पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
निष्काळजीपणामुळे दोन जीव गेल्याचा संताप काळे वस्तीजवळील वीजवाहक तार गेल्या महिनाभरापासून तुटून जमिनीवर पडलेली होती. याबाबत अनेक वेळा संबंधितांना तोंडी सूचना देऊनही दुरुस्ती करण्यात आली नाही. अखेर याच निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप जीवांना जीव गमवावा लागल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला. दोषींवर कठोर कारवाई करून मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.