लोणंद : नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सुखेड आणि बोरी गावांच्या सीमेवरील ओढ्यात रंगणारा पारंपरिक ‘बोरीचा बार’ यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. वाद्यांच्या कडकडाटात दोन्ही गावांतील महिलांनी समोरासमोर येत एकमेकींना हातवारे करत शिव्यांची लाखोली वाहिली आणि वर्षानुवर्षांची ही अनोखी परंपरा कायम ठेवली.
दुपारी सव्वा बाराच्या सुमारास सुखेड गावातील महिला डफडे, ताशा, शिंग आणि तुतारीच्या गजरात वाजतगाजत ओढ्याच्या काठावर दाखल झाल्या. त्यांनी टाळ्यांचा कडकडाट आणि हातवारे करत ‘बोरीचा बार’ सुरू केला. त्याच वेळी बोरी गावातील महिलांचा मोठा समूहही वाजतगाजत ओढ्याच्या दुसऱ्या तीरावर आला आणि दोन्ही बाजूंनी एकमेकींना आव्हाने देत प्रतिवाद सुरू झाला. जसजसा वाद्यांचा ठेका वाढत गेला, तसतसा दोन्ही गावांतील महिलांचा उत्साहही शिगेला पोहोचला.
यंदा ओढ्यामध्ये पावसाचे मुबलक पाणी असल्याने महिलांनी पाण्यात उतरून सुमारे पाऊण तास हा सोहळा रंगवला. ही आगळीवेगळी परंपरा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी ओढ्याच्या काठावर मोठी गर्दी केली होती. महिलांसह बघ्यांची वाढती गर्दी नियंत्रित करताना पोलीस प्रशासनाची आणि ग्रामस्थांची मोठी कसरत झाली.
‘बोरीचा बार’ संपन्न झाल्यानंतर दोन्ही गावांतील महिलांनी आपापल्या गावात परतून झिम्मा-फुगडी आणि फेर धरत पारंपरिक खेळांचा आनंद लुटला. या निमित्ताने सुखेडच्या माळावर पाळणे, मेवा-मिठाई आणि विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आल्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.