संगम माहुलीत ३०७ वा 'शौर्य आगमन दिवस' उत्साहात साजरा; महाराणी येसूबाई साहेबांच्या समाधीस्थळी अभिवादन; इतिहासप्रेमींची मोठी उपस्थिती

by Team Satara Today | published on : 04 July 2026


सातारा : तब्बल २९ वर्षांहून अधिक काळ मोगलांच्या कैदेत राहिल्यानंतर ४ जुलै १७१९ रोजी महाराणी येसूबाई साहेबांचे साताऱ्यात ऐतिहासिक आगमन झाले होते. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ शनिवारी संगम माहुली येथे ३०७ वा 'शौर्य आगमन दिवस' उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

महाराणी येसूबाई फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत संगम माहुली व जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कृष्णा-वेण्णा संगमावरील महाराणी येसूबाई साहेबांच्या समाधीस्थळी हा सोहळा पार पडला. हे समाधीस्थळ नुकतेच राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाल्याने यंदाच्या कार्यक्रमाला विशेष ऐतिहासिक महत्त्व लाभले.

कार्यक्रमाची सुरुवात शिववंदनेने झाली. त्यानंतर सुहास राजेशिर्के व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराणी येसूबाई साहेबांच्या समाधीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पारंपरिक मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संगम माहुली येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून इतिहासाची माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, युवा नेते संग्राम बर्गे आणि ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि पत्रकार हरीश पाटणे यांनी दूरध्वनीद्वारे कार्यक्रमास शुभेच्छा देत उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी विक्रांत मंडपे, योगेश चौकवाले, जयश्री चौकवाले, निलेश पंडित, नीलिमा पंडित, निशांत पंडित, धनंजय खोले, प्रकाश माने तसेच उपसरपंच कोळपे यांच्यासह ग्रामस्थ, इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराणी येसूबाई साहेबांच्या त्याग, स्वराज्यनिष्ठा आणि संघर्षाला उपस्थितांनी अभिवादन करत त्यांच्या कार्याचा वारसा जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला. समाधीस्थळी इतिहासप्रेमींची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली बंटीराजे भोसले, दिलीप गायकवाड, येसूबाई फाउंडेशनचे पदाधिकारी, ग्रामपंचायत संगम माहुली तसेच जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बनावट सोन्याच्या बांगड्या तारण ठेवून फसवणूक करणारी टोळी जेरबंद; तीनजणांना अटक; 10 लाख 35 हजारांचे तीन गुन्हे उघड
पुढील बातमी
परळी खोऱ्यातील बिबट्याचा न्युमोनियाने मृत्यू; वन्यजीवांमधील संसर्गजन्य आजारांचा धोका पुन्हा अधोरेखित

संबंधित बातम्या