सातारा : ना. अजितदादा पवार यांच्यामुळेच सातारा जिल्ह्याचा विकास झाला आहे. त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी हा एक नंबरचा पक्ष असून आगामी काळातही आपल्याला हे स्थान कायम ठेवायचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काही पक्ष स्वबळाची भाषा करत आहेत. आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही स्वबळाची तयारी ठेवावी, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले.
येथील राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) कार्यालयात राष्ट्रवादी सभासद नोंदणीचा शुभारंभ तसेच शिवजयंती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत ना. पाटील बोलत होते. याप्रसंगी आ. सचिन पाटील, राज्य सरचिटणीस प्रतापराव पवार, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, कार्याध्यक्ष संजय देसाई, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, युवकचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सीमा जाधव यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
ना. मकरंद पाटील म्हणाले, प्रामाणिक कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम राष्ट्रवादी करणार आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये मित्रपक्षांसोबत समान वाटा आपल्यालाही मिळणार असून त्या ठिकाणी चांगले कार्यकर्ते पाठवून गावापासून जिल्ह्यापर्यंतचे सर्व प्रश्न आपण मार्गी लावणार आहोत. 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर 9 आमदार आणि 2 खासदार पक्षाने दिले. जिल्हा परिषदेमध्ये 64 सदस्यांपैकी 41 सदस्य हे राष्ट्रवादीचे निवडून आले होते. सर्वच पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती. विधानसभा निवडणुकीपासून सर्व गणिते बदली असून आपण आता केंद्र व राज्याच्या सत्तेत सहभागी आहोत. ना. अजितदादांनी प्रतापगड विकास, क्षेत्र महाबळेश्वरचा विकास, जिल्हा क्रीडा संकुल अशी मोठी कामे केली आहेत. सातार्यात स्मशानभूमी उभारतानाही राजेंद्र चोरगे यांना दादांनी मदत केली आहे.’
दरम्यान, शिवजयंती दि. 19 ते 27 फेब्रुवारीपर्यंत अजित पर्व अंतर्गत शिवजयंती सप्ताह, स्वच्छता अभियान, मराठी भाषेचा विकास असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. छ. शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे आपण हे दिवस दिसत पाहत आहोत. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने आपल्या पक्षाचे काम सुरु असून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनाही घेऊन आपण पुढे जाणार आहोत. छ. शिवाजी महाराज यांचे विचार कोणा एका पक्षाने हॅक केले तर तसे चालणार नाही. यासोबतच राष्ट्रवादी सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ झाला आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या अभियानात झोकून काम करावे, असे आवाहनही ना. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, प्रदीप विधाते, माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील, सुरेंद्र गुदगे, राजेश पाटील-वाठारकर, राजेंद्र लवंगारे, डी. के. पवार, अर्जुनराव काळे, सीमा जाधव, स्मिता देशमुख, श्रीनिवास शिंदे यांचीही उपस्थिती होती.