सातारा : दोन दिवसांपासून विविध माध्यमांमध्ये येत असलेल्या जमगीन येथील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ओढ्यातून प्रवास करावा लागतो अशा आशयाच्या बातमी बाबत सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी वस्तुस्थिती समोर आणली आहे.
सदर बातमीमध्ये जमगीन येथील अंगणवाडीतील विद्यार्थी जीव धोक्यात घालून ओढ्यातून प्रवास करत शाळेला जात असल्याचे म्हटले आहे. तथापि हे प्राथमिक शाळेत शिकत असलेले विद्यार्थी आहेत. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अंगणवाडीतील विद्यार्थी आहेत असे चुकीचे दाखवलेले आहे. सद्यस्थितीत अंगणवाडी जुन्या प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीत भरत आहे. याबाबत पालकांनीही आपले लेखी म्हणणे प्रशासनाकडे दिलेले असून त्यांचे लेखी म्हणण्याप्रमाणे त्यांच्या पाल्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा ओढा नाही व कोणत्याही प्रकारच्या पोल वरुन चालावे लागत नाही, काही माध्यमांमधून जे दाखवले जात आहे ती सत्य परिस्थिती नाही,असा असे पालकांनी लेखी दिले आहे. असा खुलासा सातारचे गट विकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांवर जो व्हिडीओमध्ये दिसत आहे ती सत्यपरिस्थिती नाही. सदरचा व्हिडीओ काढण्यासाठी शनिवारी शाळेच्या वेळेनंतर विद्यार्थ्यांना घरुन नेण्यात आले व तो व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. सदर व्हिडीओ हा शाळेत येताना-जातानाचा नसून फक्त व्हिडीओ काढण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना बोलावून घेतले आहे. अशा प्रकारे अल्पवयीन बालकांचा जीव धोक्यात घालून व्हिडीओ शूट करणे अत्यंत धोकादायक आहे. सदर ही बाब गंभीर असून अल्पवयीन बालकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. नागरिकांनी अथवा माध्यम प्रतिनिधींनी अशा प्रकारे अल्पवयीन बालकांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहनही गटविकास अधिकारी सतीश बुधे यांनी केले आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सातारा २ अंतर्गत चाळकेवाडी येथे दोन अंगणवाडी केंद्र कार्यरत असून चाळकेवाडी-जगमीन वस्ती ४३ अंगणवाडी केंद्रामध्ये सद्यस्थितीत ३ ते ६ वर्ष वयोगटातील ४ लाभार्थी आहेत. याठिकाणी ३ वर्षापर्यंतची बालके, गरोदर महिला व स्तनदा माता हे लाभार्थी नाहीत. संबंधित अंगवाडीसाठी सन २०२२-२३ मध्ये नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम मंजूर झालेले असून सदर काम ऑक्टोंबर २०२३ मध्ये पूर्ण झालेले आहे. सदर इमारत अद्याप अंगणवाडीच्या ताब्यात मिळालेली नाही. सदर अंगणवाडीची नवीन इमारत ताब्यात मिळाल्यानंतर अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना येण्या-जाण्यास ओढ्यावर पुल बांधणे आवश्यक आहे.
चाळकेवाडी अंतर्गत खालची जगमीन ते वरची जगमीनच्या मध्ये तारळी नदीच्या उगमस्थानावर आर.सी.सी. पूल बांधकाम करणे रु. एक कोटी रुपये व चाळकेवाडी ते जगमीन दरम्यान ठोसेघर धबधबा सांडव्यावर साकव पूल बांधणे रु. 50 लक्ष रुपये या कामांचा समावेश सन 2025-2026 च्या जिल्हा वार्षिक आराखड्यात होण्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, सातारा यांना पत्र दिलेले आहे, असाही खुलासा बुद्धे यांनी केला आहे.