सातारा सोलापूर रेल्वे स्टेशन मार्गावर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करा

शिवसेना महिला आघाडीची मागणी; नीता जगताप यांना निवेदन

by Team Satara Today | published on : 26 September 2025


सातारा : भारतीय सैन्य दल, नौदल आणि विविध शासकीय सेवातील अधिकाऱ्यांसह दक्षिण भारतातील देवस्थानाच्या ठिकाणी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी कोरेगाव आगाराने सातारा सोलापूर रेल्वे स्टेशन मार्गावर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. 

महिला आघाडीच्या शहरप्रमुख उल्काताई मालुसरे व ललिताताई पोतदार यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगाराच्या व्यवस्थापिका नीता जगताप यांची शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भेट घेऊन निवेदन सादर केले व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. 

दक्षिण भारतामध्ये रेल्वेद्वारे प्रवास अत्यंत सोयीस्कर असून त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासी, भाविक आणि अधिकारी वर्ग हा सोलापूर येथून रेल्वेद्वारे प्रवास करतात. सोलापूर येथूनच ये जा केली जाते, सोलापूर रेल्वे स्टेशन ते सोलापूर एस. टी. बस स्थानक हे अंतर जास्त असून रेल्वेच्या वेळापत्रकानुसार एस. टी. चे वेळापत्रक नसल्याने प्रवाशांना विनाकारण सोलापूर बसस्थानकावर ताटकळत बसावे लागते, असा आजवरचा अनुभव आहे. 

कोणार्क एक्सप्रेसद्वारे जास्त करून सैन्य, वायुसेना आणि नौदलातील अधिकारी प्रवास करतात. त्याचबरोबर दक्षिण भारतातील तिरुपती बालाजी, पिठापूर, श्रीशैलम व अन्य देवस्थानाला जाण्यासाठी देखील याच मार्गाचा वापर केला जातो. कोणार्क एक्सप्रेस ही सोलापूर येथे शक्यतो सायंकाळी सव्वा सहा ते साडेसहा वाजण्याच्या दरम्यान पोहोचते, मात्र सोलापूर सातारा मार्गावरील बस ही सहा वाजता निघून जाते. त्यामुळे प्रवाशांना या बसचा उपयोग होत नाही. त्यांना पुन्हा आठ वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागते. त्यामुळे कोरेगाव आगाराने सातारा सोलापूर रेल्वे स्टेशन ही बस सेवा सुरू करून ती रेल्वेच्या वेळापत्रकाच्या आधारे कार्यान्वित करावी, जेणेकरून सातारा जिल्ह्यातील सर्वच प्रवाशांना त्याचा फायदा होईल आणि देश सेवेसाठी योगदान देणाऱ्या लष्करी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोय होईल, असेही मालुसरे व पोतदार यांनी निदर्शनास आणून दिले.

आपल्या निवेदनाचा विचार नक्की केला जाईल, ते तातडीने विभागीय पातळीवर सादर करणार असल्याचे आगार व्यवस्थापिका जगताप यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बालक्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास
पुढील बातमी
परतीच्या पावसाने साताऱ्यात पुन्हा दाणादाण; बळीराजा पुन्हा आक्रंदला

संबंधित बातम्या