जिल्हा परिषद अध्यक्षांना देणार धोतऱ्याचे फूल - सुशांत मोरे, आरफळ ग्रामपंचायत सदस्याच्या अपात्रतेचा निर्णय रखडल्याचा यांचा आरोप

दि. १७ नोव्हेंबरला अध्यक्षांच्या दालनासमोर आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा

by Team Satara Today | published on : 25 October 2026


सातारा : राजकीय काम आणि प्रचारात व्यस्त , पण प्रशासकीय कर्तव्यांचे सातारा जिल्हा परिषद अध्यक्षांना विसर पडला आहे. आरफळ ग्रामपंचायत सदस्याच्या कथित गैरहजेरीप्रकरणी कारवाईचा निर्णय घेण्यास जाणिवपूर्वक विलंब केला जात आहे. दि.१६ नोव्हेंबर पर्यंत यावर निर्णय न घेतल्यास दि.१७ नोव्हेंबर रोजी अध्यक्षांना धोत्र्याचे फुल देऊन त्यांच्या दालनासमोर आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा लेखी इशारा  सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक,पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांच्या राजकीय घडामोडींमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा जास्त व्यस्त असल्याचा आरोप करत सुशांत मोरे यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वोच्च पदावर विराजमान असताना राजकीय कार्यक्रमांपेक्षा प्रशासकीय जबाबदाऱ्यांना प्राधान्य देणे अपेक्षित आहे. मात्र, सलग ८ मासिक सभेला आरफळ ग्रामपंचायत सदस्य अजय रामचंद्र पवार हे गैरहजेरी होते. याप्रकरणी दि.२८ सप्टेंबर रोजी पुराव्यानिशी तक्रार देऊनही अद्यापही कारवाई होत नसल्याने अध्यक्षांना आपल्या पदाच्या कर्तव्याचा विसर पडला की कायदेशीर ज्ञान कमी, असा सवाल सुशांत मोरे यांनी उपस्थित केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांना माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, आरफळ ग्रामपंचायतीचे सदस्य अजय रामचंद्र पवार हे डिसेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत सलग ८ महिने मासिक सभांना पूर्णवेळ गैरहजर राहिल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित सभांची नोटीस स्वीकारूनही ते सभांना उपस्थित राहिले नसल्याचे मोरे यांचे तक्रारीसोबत आवश्यक कागदपत्रे आणि पुराव्यांसह दि.२८ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३६ नुसार मासिक सभांच्या आयोजना संदर्भातील तरतुदी आहेत, तर कलम ४० नुसार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांनी त्या सदस्यावर अपात्रतेची कारवाई ही संबंधित गैरहजेरीची पडताळणी करून नियमानुसार निर्णय घेण्याची मागणी सुशांत मोरे यांनी केली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांनी पंचायत विभागातील अधिकाऱ्यांकडून योग्य कायदेशीर सल्ला घेऊन प्रकरणाचा निपटारा करणे अपेक्षित आहे. स्थायी समितीचे सचिव असलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी कायद्यातील तरतुदी तपासून कार्यवाही करावी. ही कारवाई होत नसल्याने अध्यक्षांच्या कार्यक्षमतेवरही सुशांत मोरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
दि. १६ नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम नाही तर धोतऱ्याचे फूल
आरफळ ग्रामपंचायत सदस्य अजय रामचंद्र पवार यांच्या प्रकरणात तक्रारीची आणि पुराव्यांची पडताळणी करून दि. १६ नोव्हेंबरपूर्वी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी सुशांत मोरे यांनी केली आहे. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत )आणि सातारचे गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वयाने निर्णय घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे. या मागणीला प्रतिसाद न मिळाल्यास दि. १७ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांच्या दालनासमोर आत्मक्लेश आंदोलन करून त्यांना धोतऱ्याचे फूल देण्यात येईल, असा इशारा सुशांत मोरे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
पक्षाचा झेंडा बाजूला ठेवा आणि अध्यक्षपदाची जबाबदारी निभवा
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक राजकीय लक्षवेधी ठरली होती. मात्र, पद मिळाल्यानंतर पक्षीय राजकारणा पलीकडे जाऊन संपूर्ण जिल्ह्याच्या हितासाठी काम करणे , ही अध्यक्षांची प्रमुख कर्तव्य आणि जबाबदारी आहे. अध्यक्षा प्रिया शिंदे या भाजपच्या प्रचारात आणि पक्षवाढीच्या कार्यक्रमांत अधिक सक्रिय दिसत असतात.
“अध्यक्षपद हे केवळ राजकीय प्रतिष्ठेचे प्रतीक नाही, ते जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे घटनात्मक आणि प्रशासकीय उत्तरदायित्व आहे. पक्षासाठी फुल टाईम वेळ आहे, मग जिल्हा परिषदेच्या कामांसाठी वेळ कसा काढणार की नाही,” असा सवाल उपस्थित करून सुशांत मोरे यांनी अध्यक्षांनी आपले अधिकार, जबाबदाऱ्या, कामे आणि कर्तव्ये यांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भारत देश मुकेश अंबानी चालवत आहेत का? : पृथ्वीराज चव्हाण, एपस्टीन फाईल वरून केंद्र सरकारला घेरले
पुढील बातमी
साताऱ्यात भाजी मंडईत वृद्धाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा

संबंधित बातम्या