'छात्रों की गूंज' कार्यक्रमावरून वाद; मोदींची नक्कल केल्याप्रकरणी भाजपचा राहुल गांधींवर हल्‍लाबोल, भाजप -काँग्रेसमध्‍ये आरोप प्रत्‍यारोप

by Team Satara Today | published on : 20 September 2026


दिल्ली :  इंदूरमध्ये शनिवारी (दि. १९ सप्‍टेंबर) लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संबोधित केलेल्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात राहुल गांधी व्‍यासपीठावर असताना स्टँड-अप कॉमेडियन पुलकित मणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एका वृद्ध महिलेमधील संवादाची नक्कल केली. यावेळी राहुल गांधींनी त्यावर टिप्पणी करत पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. यावरुन भाजपने 'आई हा राजकारणाचा विषय नाही', अशी सोशल मीडियावर पोस्‍ट करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, कॉमेडियन पुलकित हे मोदींची परदेशी नेत्यांशी बोलण्याची शैली हुबेहूब सादर करताना दिसत आहेत. त्यांच्या या सादरीकरणात पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरण आणि एका रॅलीदरम्यान घडलेल्या त्या घटनेचाही संदर्भ होता, जिथे मोदींनी आपले भाषण थांबवून गर्दीतील एका वृद्ध महिलेसाठी खुर्ची देण्याची सूचना केली होती. पुलकित यांनी त्या घटनेचा उल्लेख केल्यावर गांधी हसताना दिसले. "एकीकडे पंतप्रधान मोदींनी एका वृद्ध मातेला आदर आणि प्रेम दिले, तर दुसरीकडे राहुल गांधींनी आपल्या कार्यक्रमात तिची थट्टा केली," असे भाजपने 'एक्स' (X) वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज 'एक्स' (X) वर पोस्ट करत म्हटले की, "काँग्रेस पक्ष आता विनोदी कलाकार आणि विदूषकांचा पक्ष बनला आहे. ते कायमचे संपले आहेत... त्यांना श्रद्धांजली (Rest in peace)." दुसरीकडे, काँग्रेसने भाजप आणि आरएसएसवर शिक्षण व्यवस्था पोकळ आणि भ्रष्ट केल्याचा आरोप केला. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, "राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि म्हणूनच ते सरकारला प्रश्न विचारतात व उत्तरदायित्वाची मागणी करत आहेत."


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भजनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रमुग्ध; निवासस्थानी गणेशोत्सवाची धामधूम; मोरयाच्या जयघोषात गौराई गणपतीचे विसर्जन
पुढील बातमी
मुंबईत कोस्टल रोडवरील पुलावर भरधाव बीएमडब्ल्यू कारला भीषण अपघात; तीन तरुण जागीच ठार, एक गंभीर जखमी

संबंधित बातम्या