खटाव : मायणी, कातरखटाव, कलेढोण व निमसोड या मंडलात पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांना पंचनामे करण्यास सांगितले आहे. जी प्राथमिक टप्प्यातील मदत करायला लागेल, ती करणार असून, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, असे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
पडळ व कलेढोण (ता. खटाव) येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, भाजपचे खटाव तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, पोलिस निरीक्षक घनश्याम सोनावणे, सोमनाथ भोसले, विशाल बागल, चिन्मय कुलकर्णी, सरपंच प्रीती शेटे आदी उपस्थित होते.
तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या १४२ मिलिमीटर पावसामुळे पडळचे सुमारे ३० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, त्याची मंत्री गोरे व अधिकाऱ्यांच्याकडून पाहणी करण्यात आली. त्यात पडळ व कलेढोणच्या पाहणी दौऱ्यात मका, बाजरी, आले, कांदा, उडीद, बटाटा व काळा घेवडा पिकांचा समावेश आहे.
पडळमधीळ अमोल सानप, कलेढोण- तरसवाडी घाटाजवळच्या शिवाजी खरात, ढोकळवाडीतील उत्तम खांडेकर, बाळू खांडेकर, मोहन खांडेकर आदी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानाची त्यांनी माहिती घेतली.
यावेळी मंत्री गोरे म्हणाले, ‘‘४८ तासांपेक्षा जास्त पाणी शेतात राहिले, की शेतीचे नुकसान होणारच. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांनी एकही शेतकरी पंचानाम्यापासून राहू नये, याची काळजी घ्यावी. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून, जेवढी मदत करणे शक्य आहे, तेवढी मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’’
यावेळी तालुका कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे, ग्राममहसूल अधिकारी प्रकाश मोहिते, पोलिस पाटील सचिन शेटे व संतोष सकट आदी उपस्थित होते.