बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई

40 सायलेन्सर व हॉर्न केले जप्त

सातारा : दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून त्यामधून छातीत धडकी भरेल असा फटाक्यांचा आवाज काढत दुचाकी दामटणाऱ्यांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दोन दिवसांत वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवली. पोलिसांनी सायलेन्सरमध्ये फेरबदल केलेली वाहने दुचाकीस्वारांसमवेत त्यांच्याच वाहनांवर बसून कार्यालयात आणली. ४० मॉडिफाइड केलेले सायलेन्सर जागेवरच काढून दुचाकीस्वारांना पुन्हा वाहन ताब्यात देण्यात आले.

दुचाकीस्वारांकडून नियमांचे भंग होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्याचप्रमाणे शहरातील विविध पेठांसह प्रमुख रस्त्यांवरून सुसाट धावणाऱ्या दुचाकीस्वारांवर, तसेच सायलेन्सरमधून कर्णकर्कश आवाज काढत धावणाऱ्या दुचाकी जप्त कराव्यात, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून केली जात होती.

त्यानुसार वाहतूक शाखेने शहरातील प्रमुख रस्त्यांसह विविध ठिकाणी अशा दुचाकींचा शोध घेण्यास प्रारंभ केला. संबंधित दुचाकी वाहतूक शाखेत आणल्या जात होत्या. ज्या दुचाकी वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल केलेले सायलेन्सर जप्त करण्यात आले. या मोहिमेदरम्यान काही दुचाकी वाहनधारक पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकार घडले. नियमांची माहिती दिल्यानंतर दुचाकीस्वारांनी पोलिसांशी नमते घेत कारवाईस सहकार्य केले.

मागील बातमी
शेख हसीना यांना बांगलादेशच्या हवाली केले नाही तर..
पुढील बातमी
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर

संबंधित बातम्या