नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये घडामोडी घडत असतानाच माजी पंतप्रधान शेख हसीना या लंडनला जाणार की नाही याची देखील चर्चा सुरु आहे. त्या सध्या भारतात आश्रयात आहेत. यादरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “परराष्ट्र मंत्री यांनी काही तासांपूर्वीच परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांची बांगलादेश आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर चर्चा झाली.
शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर त्यांनी भारतामध्ये आश्रय घेतलाय. आता त्यांना लंडनमध्ये जायचे आहे. पण यूकेकडून अजून हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना भारतातच राहावे लागत आहे. ब्रिटनने राजकीय आश्रय देण्याबाबत त्यांच्याकडे कोणताही नियम नसल्याचे म्हटले होते. पण तरी देखील यावर प्रक्रिया सुरु असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही शेख हसीना यांच्या भविष्यातील योजनांबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक लोकांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेण्यात आलाय. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांच्या सुरक्षेसाठी बांगलादेशच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. रणधीर जैस्वाल म्हणाले की, “आम्ही ढाकामधील अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहोत. बांगलादेशच्या लोकांचा जवळचा मित्र म्हणून आम्हाला देशात लवकरच शांतता प्रस्थापित करण्याची इच्छा आहे. स्थैर्य शक्य तितक्या लवकर पुनर्संचयित केले जावे जेणेकरुन सामान्य जीवन पुन्हा सुरू होईल.
रणधीर जैस्वाल पुढे म्हणाले की, “बांग्लादेशमध्ये 9,000 विद्यार्थ्यांसह 19,000 लोक आहेत. त्यापैकी बहुतेक लोक परत आले आहेत. आमचे उच्चायुक्तालय त्यांना मदत करत आहे. विमानसेवा सुरू आहे. बरेच लोक परत आले आहेत. आमचे अनावश्यक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य ही माघारी आले आहेत. आशा आहे की परिस्थिती लवकरच सामान्य होईल.