जावळी : जावळी तालुक्याच्या हद्दीत काही ठिकाणी आवश्यक परवानग्या न घेता भंगार व्यवसाय सुरू असल्याचा आरोप होत असून, या व्यवसायामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.संबंधित जावळी तालुक्यातील भंगार व्यवसायाच्या परिस्थितीचे चित्रण करणाऱ्या व्हिडिओमध्ये तसेच फोटोमध्ये शेतीच्या परिसरालगत पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या,भंगार व टाकाऊ साहित्य साठवून ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे शेती करणेच दिवसेंदिवस कठीण होत असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होऊ लागली आहे.
तसेच हिरव्यागार शेतीच्या अगदी लगत भंगार व्यवसायासाठी उभारण्यात आलेले विनापरवाना अनाधिकृत पत्र्याचे शेड आणि त्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर टाकाऊ साहित्याचा साठा होतो आहे.एका बाजूला शेतात पिके उभी असताना दुसऱ्या बाजूला प्लास्टिक व भंगाराचे ढीग साचलेले असल्याने शेती आणि भंगार व्यवसाय यांच्यातील अंतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पावसाळ्यात या कचऱ्यातील प्लास्टिक,घाण व इतर टाकाऊ पदार्थ वाहून शेतात अथवा पाण्याच्या प्रवाहात जाण्याची शक्यता असून,त्याचा मातीच्या गुणवत्तेवर आणि पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो,अशी भीती स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत.
तसेच भंगार व्यवसायातून निर्माण होणारा प्लास्टिक कचरा,धूळ,दुर्गंधी तसेच इतर टाकाऊ पदार्थ शेतजमिनीच्या आसपास पडून राहत असल्यास शेतकऱ्यांना शेतीच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात.शेताकडे जाणारे मार्ग अडवले जाणे,बांधांवर कचरा साचणे,पाण्याचा नैसर्गिक निचरा बिघडणे आदी समस्या निर्माण होत असल्याचा दावा शेतकरी करू लागले आहेत.शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या शेजारीच अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ठीक ठिकाणी भंगार साठविले जात असेल,तर प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
भंगार व्यावसायिकांकडे व्यवसायासाठी आवश्यक परवाने आहेत का?
तसेच भंगार व्यावसायिकांकडे व्यवसायासाठी आवश्यक परवाने आहेत का? ग्रामपंचायतीची परवानगी घेतली आहे का? संबंधित जागेचा वापर भंगार साठवणुकीसाठी करण्यास कायदेशीर मान्यता आहे का? शेतीच्या जमिनीवर व्यावसायिक स्वरूपाचा वापर होत असल्यास त्यासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का? याची महसूल व स्थानिक प्रशासनाने तपासणी करावी,अशी मागणी शेतकरी व स्थानिक नागरिक करत आहेत.
नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई करा
तसेच भंगारामध्ये प्लास्टिक,इलेक्ट्रॉनिक कचरा किंवा इतर घातक स्वरूपाचे साहित्य असल्यास त्याची साठवणूक,वर्गीकरण आणि विल्हेवाट कोणत्या पद्धतीने केली जाते, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. तसेच प्लास्टिक, कागद, रबर आणि इतर ज्वलनशील वस्तू मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी साठविल्यास आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. भंगाराच्या शेडलगत शेती व लोकवस्ती असल्यास एखादी दुर्घटना घडल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अग्निसुरक्षेच्या उपाययोजना आहेत का, याचीही संबंधित यंत्रणांनी पाहणी करणे गरजेचे आहे.
तसेच महसूल विभाग,ग्रामपंचायत,प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित यंत्रणा तसेच इतर सक्षम विभागांनी संबंधित ठिकाणी संयुक्त पाहणी करून पंचनामा करावा. व्यवसायिकांकडे असलेल्या परवानग्या व कागदपत्रांची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई करून शेतीच्या नुकसानीची पाहणी करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.
‘भंगार व्यवसाय की शेतीचा बळी?’
एकीकडे शेतकरी शेती वाचविण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे शेतीच्या परिसरातच भंगाराचे ढीग साचत असतील,तर प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.भंगार व्यवसायिकांना नियम लागू आणि शेतकऱ्यांना मात्र त्रास सहन करावा लागणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
जावळी तालुक्यात शेतीच्या बांधालगत भंगाराचा साठा? प्लॅस्टिक कचऱ्यामुळे शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली
by Team Satara Today | published on : 05 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा