फुले दाम्पत्याचा समतेचा लढा नव्या पिढीने पुढे न्यावा : यशेंद्र क्षीरसागर, शाहूपुरी माध्यमिक विद्यालयात व्याख्यान

by Team Satara Today | published on : 29 October 2026


सातारा : "महात्मा जोतिबा फुले व क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण जीवन समाजात न्याय, समता व बंधुता निर्माण करण्यासाठी अर्पित केले. समाजाचा पराकोटीचा विरोध सहन करत, अपमान सहन करत स्त्रिया, अस्पृश्य ,शेतकरी अशा शोषित, वंचित ,पीडित घटकांसाठी जीवन वेचले. फुले दांपत्याचा हा समतेचा लढा पुढे नेण्याची जबाबदारी नव्या पिढीची असल्याचे" प्रतिपादन विस्तार अधिकारी प्रसिद्ध वक्ते यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.                                                                                                                  ते येथील राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ, शाहूपुरी,सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयात "चला करुया जागर महापुरुषांच्या विचारांचा" या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर भारत भोसले, शालाप्रमुख पी. के. दीक्षित, एस. एम. बारंगळे,एन. ए. कांबळे,एम.आर. जाधव,ए.व्ही.भोसले, पी. एम. साळुंखे,चंद्रकांत देशमुख, जी. जे. देसाई, एम. बी. भोसले, डी. डी. कुचेकर व पी. ए.भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ, शाहूपुरी,कट्टा ग्रुप व शाहूपुरी गणेशोत्सव मंडळ यांच्या माध्यमातून परिसरात महात्मा फुले यांचे २०० वी जयंती वर्ष, संत गाडगे बाबा यांचे १५० वे जयंती वर्ष व महाड चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष निमित्ताने  विधायक उपक्रम राबविण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून  वृद्धाश्रमास भेट, वृक्षारोपण, पथनाट्य स्पर्धा,कथा लेखन स्पर्धा,भारतीय घटनेवर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा आदी कार्यक्रम संपन्न झाले आहेत. या उपक्रममालिकेचा एक भाग  'फुले दांपत्याचे सामाजिक योगदान' या विषयावर यशेंद्र क्षीरसागर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
पुढे बोलताना श्री. क्षीरसागर यांनी फुले दांपत्याने स्री शिक्षण,शेतकरी जीवनमान सुधारणे,अस्पृश्यता निवारणासाठी केलेल्या कार्याची शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विस्ताराने  माहिती देत आपले आजचे सुखमय जीवन ही या सर्व महापुरुषांनी केलेल्या निस्सीम त्यागाची परिणती असल्याचे सांगितले. या महान विभूतींचे केवळ जयंती-पुण्यतिथीस स्मरण करून चालणार नाही. तर सध्याच्या सामाजिक जीवनाचा विचार करता त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांचे वाटेवर प्रत्यक्ष कृतीतून वाटचाल करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. त्यांनी इयत्तेनुसार दोन गटांत फुले दांपत्यासह राष्ट्र निर्माण कार्यात अमूल्य योगदान दिलेल्या महान विभूतीच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी निबंध लेखन स्पर्धा स्वतः तर्फे प्रवेश फी न घेता जाहीर केली.
कु. ऋतिका चव्हाण या विद्यार्थीनीने आभार मानले.
संवेदनशील नागरिक बनवणे हाच शिक्षणाचा उद्देश!
शिक्षणाचा मूलभूत उद्देश हा नोकरी ,वैयक्तिक प्रगती अथवा भौतिक प्रगती नाही.शिक्षणाचा प्रथम उद्देश हा संवेदनशील नागरिक बनवणे हा आहे. आपल्या भोवती दुःखी लोक आहेत. पशु, प्राणी आहेत. त्यांच्याबाबत मनात संवेदनशीलता असायला हवी. त्यांचे दुःख आपल्याला आपले वाटायला हवे. अशा समाजाभिमुख विचारांच्या संवेदनशील नागरिकांची गरज समाजाला आहे. त्या अनुषंगाने शिक्षण दिले गेले पाहिजे. महात्मा फुले यांनी "शिक्षणाशिवाय तरण्याचा दुसरा उपाय नाही" असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्याचे आपण कायम स्मरण ठेवायला हवे, अशी अपेक्षा श्री क्षीरसागर यांनी व्यक्त केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा आकाशवाणीवर १ नोव्हेंबरपासून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बसवेश्वर चेणगे यांचे ‘चिंतन’

संबंधित बातम्या