सातारा : मांडवे (ता. सातारा) येथे धरणवस्ती शिवारात ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व बोरगाव पोलिसांनी शुभम प्रकाश पवार (वय २९, रा. धरण वस्ती मांडवे, ता. सातारा) या कृषी पदवीधारक तरुणाला अटक केली. तसेच बाजारभावाप्रमाणे ३ लाख ९३ हजार ६७५ हजार रूपये किंमतीची शेतात लावलेली गांजाची दहा ओली झाडे पोलिसांनी हस्तगत केली.
मांडवे येथे शुभम पवार याने त्याच्या गुरांच्या गोठ्याजवळील जागेत तसेच ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, राकेश खांडके, अमोल माने, अजित कर्णे, स्वप्नील दौंड यांचे पथक व बोरगाव पोलिसांच्या डी. बी. पथकातील निलेश गायकवाड, प्रशांत चव्हाण, सतीश पवार, विशाल जाधव असे पथक कारवाईसाठी रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार शेतात जाऊन पोलिसांनी गांजाची झाडे हस्तगत केली.
संशयित शुभम पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. ऊसाच्या शेतात त्याने मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केली होती. गुरांच्या गोठ्याजवळ गाजांची १० झाडे पोलिसांना सापडली. सर्व खात्री करून तहसीलदार समीर यादव यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांचे श्वान पथकही आले. सर्व अधिकारी व पंचांसमक्ष कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून छापा कारवाई संपली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, बोरगावचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप वाळवेकर, उपनिरिक्षक विश्वास शिंगाडे यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई झाली. हवालदार राकेश खांडके यांनी माहिती दिली. पोलीस निरिक्षक निलेश तांबे तपास करत आहेत.