वाईत अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; दोन पिस्टलसह पाच जिवंत काडतुसे जप्त; वाई डीबी पथकाची कारवाई

by Team Satara Today | published on : 19 September 2026


सातारा : वाई परिसरात गावठी पिस्टलच्या जोरावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना वाई पोलिसांनी चांगलाच दणका दिला. शेंदुरजणे येथील कॅनॉलजवळ हातात पिस्टल घेऊन फिरणार्‍या एकाला पोलिसांनी रंगेहात पकडले, तर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे दुसर्‍यालाही पाठलाग करून जेरबंद केले. दोघांकडून दोन गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा 1 लाख 40 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सुदेश दीपक पाटणे आणि अक्षय विलास देसाई अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईमुळे वाई परिसरात अवैध शस्त्रे बाळगून फिरणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.
वाई-सुरूर रस्त्यावरील शेंदुरजणे हद्दीतील कॅनॉलजवळ एक युवक हातात पिस्टल मिरवत असल्याची माहिती वाई पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. पोलिसांनी दुपारी साडेबारा वाजल्यापासून कॅनॉल परिसरात सापळा लावला.
तब्बल पाच तास दबा धरून बसलेल्या पोलिसांना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संशयित सुदेश पाटणे दिसला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे गावठी पिस्टल आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले.
पोलिसी चौकशीत पाटणे याने हे पिस्टल स्वप्निल ऊर्फ सोन्या प्रदीप जगताप याच्याकडून घेतल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अक्षय देसाई यानेही त्याच्याकडून पिस्टल घेतल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी अक्षयचा शोध सुरू केला.
दरम्यान, रात्री उशिरा अक्षय देसाई हा परखंदी रोडवरील चौकात पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांना पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. अंगझडतीमध्ये त्याच्याकडे आणखी एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे सापडली.
दोन्ही आरोपींना अटक करून वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोघांना 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या पिस्टलचा वापर कोणत्या कारणासाठी करण्यात येणार होता, त्यांना शस्त्रे कोठून मिळाली आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे व त्यांच्या पथकाने केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विरोधकांच्या आरोपांना टीका करून उत्तर देणार नाही. मी कामातून उत्तर देईन - एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा
पुढील बातमी
मसाप, पुणे शाहुपुरी शाखेचे कार्य जोमात पुढे सुरु ठेवणार - नंदुकमार सावंत : वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

संबंधित बातम्या