महाबळेश्वर : देश-विदेशातील पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी ऐन दिवाळी पर्यटन हंगामातच अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सविरोधात धडक कारवाई केली आहे. या विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत शहरातील आठ हॉटेल्सची तपासणी करण्यात आली असून, त्यातील तीन नामांकित हॉटेल्सचे अन्नविक्री परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत, तर अन्य पाच हॉटेल्सना त्रुटी दूर करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
दिवाळी सुट्ट्यांच्या निमित्ताने महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत असतानाच अनेक छोटी-मोठी हॉटेल्स प्रशासनाच्या रडारवर आली होती. हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तालुक्यात ही मोहीम राबवली. या पथकाने शहरातील विविध हॉटेल्सचे किचन आणि रेस्टॉरंटची बारकाईने तपासणी केली. या तपासणीदरम्यान गंभीर स्वरूपाच्या बाबी आढळल्या नसल्या तरी, अन्न सुरक्षा व स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
या कारवाईमध्ये महाबळेश्वरमधील हॉटेल एव्हरशाईन, हॉटेल रामसुख आणि हॉटेल ब्राईटलँड या तीन हॉटेल्सच्या अन्नविक्रीचे परवाने काही दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेनंतर संबंधित हॉटेल व्यवस्थापनाने नियमांचे पूर्ण पालन करत सर्व त्रुटींची पूर्तता केली. त्यानंतर या तिन्ही हॉटेल्सचे अन्नविक्री परवाने पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. दुसरीकडे, तपासणीत किरकोळ त्रुटी आढळलेल्या अन्य पाच हॉटेल्सना प्रशासनाकडून नोटिसा बजावून तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऐन पर्यटन हंगामात अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केल्यामुळे संबंधित हॉटेल्समध्ये आगाऊ आरक्षण केलेल्या पर्यटकांची काही प्रमाणात गैरसोय झाली, मात्र प्रशासनाच्या या मोहिमेमुळे पर्यटनस्थळावरील अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महाबळेश्वरमधील तीन हॉटेल्सचे अन्नविक्री परवाने निलंबित; एफडीएच्या धडक कारवाईने हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ
by Team Satara Today | published on : 16 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा