सातारा : सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, मेढा येथील कुंभारवाड्यात आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सर्व धर्मातील विविध समाजातील लोकांसोबत अनोखी दिवाळी साजरी करून फराळाचा आनंद घेतला. यामुळे कातकरी वस्ती, गोसावी वस्ती, कुंभारवाडा, चर्मकार समाज, मुस्लिम समाज, जयभीम विकास मंडळ आंबेडकरनगर, ओतारी समाज, वीरशैव समाज आदी समाजातील उपस्थित लोक भारावून गेले.
शिवेंद्रसिंहराजेंचा सातारा- जावली मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु असून त्यांनी गाव, वाडी- वस्ती येथे जाऊन घर टू घर भेट देऊन मतदारांशी संवाद साधण्याला प्राधान्य दिले आहे. मेढा ता. जावली येथील कुंभारवाडा येथे कातकरी वस्ती, गोसावी वस्ती, कुंभारवाडा, चर्मकार समाज, मुस्लिम समाज, जयभीम विकास मंडळ आंबेडकरनगर, ओतारी समाज, वीरशैव समाज, वाणी समाज, घिसाडी समाज आदी सर्वच समाजातील माता- भगिनी आणि नागरिक यांच्यासमवेत शिवेंद्रसिंहराजेंनी दिवाळी साजरी केली. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, माजी उपसभापती कांतीभाई देशमुख, माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, माजी नगरसेवक शशिकांत गुरव, शिवाजी गोरे, संतोष वारागडे, जब्बार पठाण यासह सर्व समाजातील प्रमुख मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आपण मेढा नगरीतील गल्ली बोळातील रस्त्याचे कामही मार्गी लावले आहे. मेढा नगरीचा झपाट्याने विकास करण्याचे काम सुरु आहे. प्रत्येक गाव, वाडी- वस्ती येथे कॉंक्रीटचे रस्ते केले आहेत. प्रत्येक समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. गेल्या पाच वर्षात जावली असो अथवा सातारा तालुका असो, दोन्ही तालुक्यात हजारो कोटींची विकासकामे मार्गी लावली आहेत. मतदारसंघाचा विकास साधण्याबरोबरच आपण प्रत्येक समाजाला न्याय दिला आहे, सर्वधर्म समभाव जपून सर्व समाजाला एकोप्यात ठेवण्याचे काम केले आहे. पाच वर्षात दमडीचेही काम न करणार्या विरोधकांना या निवडणुकीत मतदारसंघातील जनता जागा दाखवेल. जनतेचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जनता कायम माझ्या सोबत आहे आणि मीही जनतेसोबत कायम आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. तरीही कोणीही गाफील न राहता विक्रमी मताधिक्य देऊन एक वेगळा इतिहास घडवावा, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी केले.