सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून कोयना अभयारण्यामुळे बाधित झालेले जावली तालुक्यातील वेळे गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत व सुविधांपासून दुर्लक्षित आहे. रेनकोट घालून पाऊसधारा झेलत खाचखळग्यांनी भरलेली चिखलवाट तुडवत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अतिदुर्गम वेळे गावातील अभयारण्यग्रस्तांची भेट घेतली. त्यांच्या जीवनात त्यांनी आशेचा नवा किरण निर्माण केला. येथील 61 कुटुंबांना खंडाळा तालुक्यात हक्काचा निवारा व शेतजमीन उपलब्ध करत वेळे गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या या कृतीतून संवेदनशीलतेचे दर्शन घडले.
1985 साली कोयना अभयारण्याची घोषणा झाली आणि त्यातूनच पुढे चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प उभा राहिला. विकासाच्या या गगन भरार्या घेताना अभयारण्यग्रस्तांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. अनेक गावे बाधित झाली. काही पुनर्वसित झाली तर काही विस्मरणात गेली. त्यातीलच वेळे हे एक गाव. जावली तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगराळ भागात वसलेले गाव अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहे. आजही या गावाला रस्ता नाही. ग्रामस्थांना पावसाळ्यात डोंगर उतारांवरून निसरड्या पायवाटांवरूनच जावे लागते. शाळा नाही, रस्ते नाहीत, आरोग्य सुविधा नाहीत, मुलं गाव सोडून बाहेर, वृद्ध लोक जंगली श्वापदांच्या भीतीच्या छायेखाली राहत आहेत. हे वास्तव जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासारख्या संवेदनशील अधिकार्यांच्या मनाला हेलावणारे ठरले. त्यांनी वेळे गावचे पुनर्वसन मार्गी लावण्याचा निर्णय घेतला.
मुसळधार पावसात ओढ्यांचे पाणी कापत, चिखलमय पायवाटांचा डोंगर चढत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी वेळे या अभयारण्यात अडकलेल्या गावकर्यांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. वेळे गाठण्यासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड यांच्यासह काही मोजके अधिकारी सोबत घेतले. वेळे गावापर्यंत गाडी जात नसल्यामुळे त्यांनी काही मैलांचा प्रवास रेनकोट घालून भर पावसात चिखल तुडवत, डोंगर उतारावरील ओढे नाल्यांना आलेला पूर ओलांडत पार केला. गावात दाखल होताच ग्रामस्थांचे डोळे चमकले. ‘जिल्हाधिकारी आमच्या गावात आले!’ ही भावना गावकर्यांसाठी आश्वासक ठरली. संतोष पाटील यांनी गावातील वृद्धांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी कोणताही औपचारिकता न दाखवता गावात फेरफटका मारला. वेळे अभयारण्यग्रस्तांनी आगळ्यावेगळा जिल्हाधिकारी पाहिला. ‘तुमचं दु:ख माझं आहे...आणि ते दूर करण्यासाठीच आलो आहे’, ही जिल्हाधिकार्यांची साधीशी भावना अभयारण्यग्रस्तांना आपलंसं करून गेली.
वेळे हे गाव फक्त नकाशावर पाहिलं जात होतं. पण तिथे जाऊन त्या माणसांच्या चेहर्यावरच्या व्यथा व वेदना प्रत्यक्ष अनुभवल्या. त्यांच्या पुनर्वसनाच्या कामात व्यक्तिगत लक्ष घातले आहे. केवळ योजना जाहीर न करता त्या प्रत्यक्ष उतरल्या पाहिजेत. पुनर्वसन करून वेळे नवे गाव वसवणे व त्यांना नागरी सुविधा देणे हे माझे कर्तव्य आहे.
संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा