दिल्ली पोलीस जिथे पकडतील, तेच तुमचं जंतरमंतर; कॉक्रोच जनता पार्टीचा नवा नेता अजिंक्य शिंदे याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 10 October 2026


दिल्ली : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्लीपोलिसांनी विमानातच कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ताब्यात घेतले. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर काही वेळाने अभिजित दिपके यांचा एक आधीच रेकॉर्ड केलेला व्हिडिओ CJPने पोस्ट केला. "हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला याचा अर्थ मला, आशुतोष रांका आणि सौरव दास या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. आमच्या अटकेनंतर आता आंदोलनाची सूत्रे अजिंक्य शिंदे यांच्या हाती असतील. तेच या देशव्यापी लढ्याचे नेतृत्व करतील," अशी अधिकृत घोषणा दिपके यांनी या व्हिडिओद्वारे केली. यानंतर काही वेळातच अजिंक्य शिंदे याने एक व्हिडीओ पोस्ट करत भारतीयवासीयांना आवाहन केले.
"आपल्या CJP चे अभिजीत दिपके, आशुतोष रांका, सौरव दास या तिघांनाही सरकारने ताब्यात घेतले आहे. सरकार देशाच्या एकजुटीला घाबरली आहे. गेल्या वेळी जेव्हा संपूर्ण देश एकजूट झाला होता, तेव्हा भल्याभल्यांचा अहंकार चक्काचूर झाला होता. यावेळी पुन्हा असे घडू नये, लोक जंतर-मंतरवर पोहोचू नयेत, यासाठी सरकारने बस आणि ट्रेन बंद केली; अनेकांना ताब्यात घेतले. सरकार घाबरलेले आहे. यातून दिसून येतं की आपण आपली अर्धी लढाई जिंकलो आहे."
"आता एका नव्या लढायची ही सुरुवात आहे. ज्यांचा मतदानाचा अधिकार चोरी झाला आहे, त्यांना त्यांचे अधिकार पुन्हा मिळायला हवेत हेच आपण मागत होतो. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा व्हायला हवा हीच आपली मागणी आहे. पण सरकारने दिल्लीत आपात्कालीन स्थिती लागू केली आहे आणि दिल्ली बंद केली आहे. माझं सर्व देशवासीयांना निवेदन आहे की तुम्ही जिथे कुठे असाल तेथून दिल्लीच्या जंतर-मंतर कडे कूच करा. जिथे तुम्हाला पोलीस थांबवतील, तेथेच तुम्ही आंदोलनाला सुरुवात करा आणि तुमचं जंतर-मंतर बनवून टाका. जोवर ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार," असा स्पष्ट इरादा अजिंक्य शिंदे यांनी बोलून दाखवला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिजित दिपके यांनी कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना शांत राहून लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले. "सर्वांना नमस्ते. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तर याचा अर्थ आम्हाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पण यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची आमची मागणी थांबणार नाही. आमच्यानंतर अजिंक्य शिंदे हे या संपूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करतील. जे नागरिक आणि कार्यकर्ते या लढ्यात सोबत आहेत, त्यांनी अजिंक्य शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा पुढे न्यावा." दरम्यान, दिल्ली पोलिसांनी तिन्ही नेत्यांना ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी नेले असून तिघांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आंदोलकांची सुटका करा... अन्‍यथा बेमुदत उपोषण आणि पदयात्रा - सोनम वांगचुक यांचा इशारा, देशात "अघोषित आणीबाणी"सदृश परिस्थिती
पुढील बातमी
अभिजीत दिपके यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; आजीच्या निधनाची बातमी दिपकेंना पोलिसांनी सांगितली, मूळ गावाकडे रवाना झाले आई-वडील

संबंधित बातम्या