पोलीस कोठडीतील हत्या प्रकरण ; ९ पोलिसांना फाशीची शिक्षा

by Team Satara Today | published on : 06 April 2026


चेन्नई: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या तामिळनाडूतील सथानकुलम पोलीस कोठडीतील हत्या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकरणात न्यायालयाने तामिळनाडू पोलीस दलातील ९ कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण 'अतिदुर्मीळ' असल्याचे नमूद करत न्यायाधीशांनी पोलिसांचे कृत्य अत्यंत निर्घृण आणि सत्तेचा गैरवापर असल्याचे ताशेरे ओढले आहेत.

​सुमारे सहा वर्षे चाललेल्या या कायदेशीर प्रक्रियेनंतर प्रथम अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. मुथुकुमारन यांनी हा निकाल दिला. न्यायाधीशांनी निरीक्षक एस. श्रीधर, उपनिरीक्षक पी. रघु गणेश, के. बालकृष्णन यांच्यासह मुख्य हवालदार एस. मुरुगन, ए. समदुरई आणि हवालदार एम. मुथुराज, एस. चेल्लादुराई, एक्स. थॉमस फ्रान्सिस व एस. वेलुमुथु या नऊ जणांना हत्या आणि पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली दोषी धरले.

​हे हृदयद्रावक प्रकरण तुतीकोरिन जिल्ह्यातील सथानकुलम येथील आहे. जून २०२० मध्ये देशभरात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू असताना, व्यापारी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेन्निक्स यांनी आपल्या मोबाईल ॲक्सेसरीजचे दुकान ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ उघडे ठेवल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. याच कारणावरून पोलिसांनी १९ जून २०२० रोजी या पिता-पुत्राला ताब्यात घेतले. सीबीआय तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पोलीस कोठडीत असताना रात्रभर या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांच्या या अमानुष छळामुळे दोघांनाही गंभीर जखमा झाल्या आणि अतिरक्तस्रावामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

​या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते आणि पोलीस कोठडीतील हिंसाचाराविरोधात संतापाची लाट उसळली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यानुसार, हा छळ पूर्वनियोजित होता आणि आरोपींनी जाणीवपूर्वक हा गुन्हा केला होता. अखेर सहा वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळाला असून, न्यायालयाने या क्रूर कृत्यासाठी सर्व नऊ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विकासाच्या प्रवाहामुळे ‘रेड कॉरिडॉर’मधील माओवादी हिंसाचाराला लगाम; प्रभावित जिल्ह्यांच्या संख्येत मोठी घट
पुढील बातमी
कोरेगावात पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यासह खाजगी इसम कालेकर १ लाख २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात जेरबंद

संबंधित बातम्या