सातारा : जावली विभागातील दुर्गम भागात असणार्या रुग्णांच्या सेवेसाठी दि. 26 ऑगस्ट रोजी मेढा, ता. जावली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याने रोगराईचा प्रादुर्भाव सुद्धा वाढला आहे. याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना बसला आहे.
त्या अनुषंगाने जावली तालुक्यासह दुर्गम भागातील रुग्णांच्या सेवेसाठी महेश हॉस्पिटल मेढा, ता. जावली आणि आमदार जी. जी. कदम प्रतिष्ठान यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये महिला, जेष्ठ नागरिक तसेच रुग्णांच्या प्राथमिक स्वरूपाच्या तपासण्या करण्यात येणार असून पुढील वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे. सातारा येथील ऑन्को लाईफ कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रसाद कवारे आणि महेश हॉस्पिटलच्या डॉक्टर अनुजा कदम यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर मेढा, ता. जावली येथील महेश हॉस्पिटल येथे सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
तरी जावली विभागातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महेश हॉस्पिटल मेढा तालुका जावली आणि आमदार जी जी कदम प्रतिष्ठान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम, सागर भोगावकर, साधू चिकणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष सागर भोगावकर (9850501283), जावली तालुकाध्यक्ष साधू चिकणे (992277732), अक्षता शिंदे (9209684317), रोहित जाधव (9423498097) यांच्याशी संपर्क साधावा.