फलटण : मुंबईमध्ये ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या झुंडशाहीच्या दबावास बळी पडून सरकारने ओबीसी आरक्षण विरोधी कोणतीही भूमिका घेऊ नये, तसेच असंविधानिकरीत्या ओबीसींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी चालू आहे, त्या कुणबी नोंदींची पडताळणी करून त्या रद्द कराव्यात, अशी मागणी फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.
त्यासाठी फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तसेच याबाबतचे निवेदन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले, की लवकरात लवकर जातीनिहाय जनगणना करावी, ओबीसी नेत्यांवर वारंवार हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, ओबीसीवर होत असलेल्या अन्यायाचा विचार करून यावर तोडगा काढावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सकाळी ११ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे ओबीसी संघर्ष समितीने रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल एक तास पुणे- पंढरपूर महामार्ग रोखण्यात आला होता. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. फलटण बसस्थानकातही एसटी बस अडकून पडल्यामुळे वाहतूक खोळंबली होती.
यावेळी फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीचे प्रमुख बापूराव शिंदे यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण देऊ नये, झुंडशाहीच्या दबावाला सरकारने बळी पडू नये, ओबीसी नेत्यांवर हल्ल्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असे सांगितले.