बावधन-शेंदुरजणे गणात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ ; युवा नेते विराज शिंदे, माजी पंचायत समिती सदस्या रुतुजा शिंदे यांचा कार्यकर्त्यांसह प्रवेश

by Team Satara Today | published on : 21 January 2026


वाई : तालुक्यातील राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या एका घडामोडीत, काही काळ युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेले, मंत्री जयकुमार गोरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे युवा नेते विराज शिंदे, माजी पंचायत समिती सदस्या सौ. रुतुजा शिंदे यांच्यासह बावधन व शेंदुरजणे गणातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

हा प्रवेश सोहळा किसन वीर कारखाना कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी माझ्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर प्रमोद शिंदे, मोहन जाधव, प्रताप पवार, मदन भोसले, किरण काळोखे, अरविंद कुदळे, शंकरआप्पा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्वाभिमानासाठी घेतलेला निर्णय – विराज शिंदे

प्रवेशावेळी बोलताना विराज शिंदे म्हणाले, “टोकाचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे आम्ही आज एकत्र आलो आहोत, हे अनेकांना आश्चर्यकारक वाटेल. पण हा निर्णय वैयक्तिक राजकारणासाठी नाही, तर बावधन व शेंदुरजणे भागाच्या स्वाभिमानासाठी घेतला आहे. येथील नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी दोन पावले मागे घेत एकोप्याचा मार्ग स्वीकारला. मतभेद विसरून या भागाच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार आम्ही केला आहे.”

ते पुढे म्हणाले, “लहानपणापासून काँग्रेस विचारांमध्ये वाढलो. काही काळ वेगळा प्रवास झाला, पण आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी केल्याने नवी ऊर्जा मिळाली आहे. विचार न पटल्याने भाजपात जाण्याचा प्रस्ताव नाकारला. यापुढील काळात जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन युवकांची मजबूत फळी उभी करणार असून पक्ष संघटनेच्या वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे.”

हा तालुक्याच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने आणि तालुक्याच्या राजकारणाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. विराज भैय्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ही घरवापसी म्हणजे ‘सुबह का भुला शाम घर आया’ यासारखी आहे. शिंदे कुटुंबीय हे पवार साहेबांच्या विचारांवर प्रेम करणारे आहेत. काही काळ दुरावा झाला असला तरी आज पुन्हा विचारांची गाठ बांधली गेली आहे.”

“यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार साहेबांचा विचार या जिल्ह्याची ओळख आहे. अनेकांनी निष्ठेचे गाणे गात वाट बदलली; मात्र विराज शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा विचार सोडला नाही, याचा आम्हाला अभिमान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखला जाईल, कुणालाही दुजाभाव होणार नाही.”

संघटनात्मक ताकद वाढली

या प्रवेशामुळे बावधन जिल्हा परिषद गट व शेंदुरजणे गणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक सक्षम झाला आहे. जुन्या व नव्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम केल्यास तिन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

समविचारी पक्षात प्रवेश – रुतुजा शिंदे

सौ. रुतुजा शिंदे म्हणाल्या, “समविचारी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. पंचायत समितीमध्ये असताना जनहिताची अनेक कामे केली. यापुढे अधिक ताकदीने पक्षाचे काम करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्याबद्दल सर्वांचे आभार.”

कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मोहन जाधव यांनी सांगितले की, “प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला असून सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रवेशामुळे विरोधकांना उमेदवार शोधणेही अवघड जाणार आहे.”

यावेळी मेघराज शिंदे, सोसायटी चेअरमन प्रकाश मारुती शिंदे, माजी सरपंच रामदास खामकर, अतुल जाधव, नितीन मांढरे, विशाल मांढरे, गणेश जाधव, आनंद मांढरे, अविनाश गाढवे, मयूर गाढवे, प्रकाश एरंडे, शांताराम शिंदे, अजिंक्य शिंदे, अनिल कांबळे, सचिन चव्हाण, योगेश देशमाने, योगेश महांगडे, नारायण महांगडे, शिवाजी कांबळे, राजू शिंदे पाटील, मोहन महांगडे, विनय शिंदे, ज्ञानेश्वर पवार, विशाल महांगडे, नरेंद्र माऊली शिंदे यांच्यासह शेकडाे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला.

प्रतापराव पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन दिलीप पिसाळ यांनी केले, तर मदन भोसले यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला बावधन जिल्हा परिषद गट, शेंदुरजणे गण व बावधन गणातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुका पोलिसांकडून अंगापूर वंदनमध्ये देशी-विदेशी दारू जप्त
पुढील बातमी
एबी फॉर्मचा सस्पेन्स ठेवत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक; अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र होणार स्पष्ट : फर्न हॉटेलवर राजकीय मांदियाळी

संबंधित बातम्या