करंजखोप येथे अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले ; आठ तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढला

by Team Satara Today | published on : 03 December 2025


कोरेगाव : करंजखोप,  ता.कोरेगाव येथे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने गावालगत असणाऱ्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. निशिगंधा नवनाथ खोमणे (वय १५) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

याबाबत वाठार पोलिसांनी तसेच घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवार (दि.३) रोजी पहाटेच्या सुमारास घडली. निशिगंधा खोमणे ही करंजखोप येथील एका शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिने विहिरीच्या काठावर अंगावरील जर्किन, चप्पल तसेच एक चिट्ठी ठेवली होती. सकाळच्या सुमारास ग्रामस्थांना विहिरीच्या काठावर सदर वस्तू दिसून आल्या. त्यामुळे संशय बळावल्याने त्यांनी तात्काळ वाठार पोलिसांना याबाबत माहिती दिली.

माहिती मिळताच वाठार पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत सुमारे ५५ फूट पाणी असल्याने शोधकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला. पोहणाऱ्या व्यक्तींच्या मदतीने तसेच पाण्यात कॅमेरा सोडून शोध घेण्यात आला. कॅमेऱ्याद्वारे मृतदेह विहिरीत असल्याची खात्री झाल्यानंतरही तो बाहेर काढणे अवघड झाले.

अखेर पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव यांनी स्वतः जीव धोक्यात घालून विहिरीत उतरून लोखंडी गळाच्या सहाय्याने मृतदेह अचूकपणे बाहेर काढला. त्यांच्या धाडसाचे ग्रामस्थांनी कौतुक करत जोरदार अभिनंदन केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुक येथे पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून चिट्ठीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण करंजखोप गावात शोककळा पसरली आहे. सदर घटनेची फिर्याद नवनाथ खोमणे यांनी वाठार पोलिस ठाण्यात दिली असून तपास पोलीस हवालदार सचिन जगताप करीत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या कन्येचा आज (गुरुवारी) विवाह सोहळा; मंत्रिमंडळातील मंत्री, विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

संबंधित बातम्या