सातारा : इसरो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून उपग्रहाच्या नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या पृथ्वीवरील प्रत्येक घडामोडीची अचूक माहिती संकलीत केली जाते. ही माहिती मानवी प्रगतीसाठी पुरक असून त्याचा वापर विद्यार्थी, सरपंच, ग्रामसेवकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरतो. शिक्षण आणि ग्राम विकासासाठी उपग्रहावर उपलब्ध असलेल्या माहिती चापुरेपूर वापर कसा करावा, याची इसरोशी संलग्न संशोधन आणि त्यातील तज्ञांच्या मार्गदर्शनाची राज्यातील "चला, उपग्रह तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करु या " ही पहिली कार्यशाळा शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी वर्ये (सातारा) येथे आयोजित करत असल्याची माहिती रयत सायन्स ॲण्ड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटरचे संचालक डॉ. सारंग भोला यांनी दिली.
वर्ये येथील रयत शिक्षण संस्थेचे रयत सायन्स ॲण्ड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर आणि पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या पुढाकाराने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो), दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे, अर्थ साईट फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने "चला, उपग्रह तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करु या " ही कार्यशाळा शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी वर्ये येथील के.बी.पी. मॅनेजमेंट इन्स्टिट्युटच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे. इसरो आणि संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी एकत्रित राज्यातील सरपंच, ग्रामसेवक, विद्यार्थ्यांसाठी अशा पध्दतीची पहिलीच कार्यशाळा आयोजित केली आहे.
आधुनिक काळात इसरो या भारतीय संशोधन संस्थेने अवकाशाला गवसणी घालताना निसर्गाच्या प्रत्येक घडामोडीची क्षणांक्षणाची माहिती संग्रहित केली जात असते. ही संकलित माहिती मानवी जीवनाच्या प्रगतीच्या वाटा सुकर होण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यासाठी इ. ८ वी, ९ वी आणि ११ वी विद्यार्थ्यांच्या मनात अंतराळ विज्ञानाचीआवड, उपग्रह तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग, अंतराळ अन्वेषणाचे महत्व यावेळी तज्ञांच्याकडून सांगितले जाणार आहे.
तसेच सरंपच, ग्रामसेवकांना दैनंदिनी कामकाजात नियोजन, अंमलबजावणीसाठी उपग्रहांवरील उपलब्ध माहितीचा सहज वापर करता येऊ शकतो. ग्राम विकासासाठी उपयुक्त असणारे भू स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून जल व्यवस्थापन, शेती, ग्रामविकास, आपत्ती निवारण क्षेत्रात प्रगती साधता येईल. या उद्देशाने इसरोचे संशोधक आणि शैक्षणिक, ग्रामविकास समूदायातील तज्ञ हे जागतिक विकासात अंतराळ तंत्रज्ञानाच्या भविष्यासंदर्भात थेट संवाद होणारी ही एक दिवसीय कार्यशाळा असल्याची माहिती पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव यांनी दिली.
सकाळी १० ते १ यावेळीत इयत्ता ८ वी, ९ वी आणि ११ वी विद्यार्थ्यांसाठी आणि दुपारी २ ते ५.३० वा.सरपंच, ग्रामसेवक, सामाजिक संस्था प्रतिनिधींसाठी अशा दोन कार्यशाळा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या कार्यशाळेत प्रवेश निश्चित करण्यासाठी गुगल शीटवर पूर्व नोंदणी आवश्यक असून मर्यादित प्रवेश दिले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी ८६०५९४५०१३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. सारंग भोला यांनी केले आहे.