पिंपोडे बुद्रुक येथे आरोग्य विभागाचा छापा; दोन बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 05 November 2026


वाठार स्टेशन : कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी अथवा अधिकृत परवाना नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील दोन बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. शिवपद सतीश मंडल आणि दत्तात्रय वामन पिंपोडकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बोगस डॉक्टरांची नावे आहेत.
वाठार स्टेशन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंडल आणि पिंपोडकर हे दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून पिंपोडे बुद्रुक व परिसरामध्ये कोणतीही कायदेशीर पात्रता नसताना बिनदिक्कतपणे बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय चालवत होते. यापूर्वी २०१६ मध्येही या दोघांच्या बोगसगिरीविरोधात वाठार पोलिसांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही संशयितांना न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत वैद्यकीय व्यवसाय करण्यास सक्त मनाई करणारी अधिकृत नोटीस बजावली होती. असे असतानाही कायद्याचे कोणतेही भय न बाळगता शिवपद मंडल हा खुलेआम पुन्हा वैद्यकीय व्यवसाय सुरू करून रुग्णांच्या जीवाशी खेळत होता. या प्रकाराबाबत आरोग्य विभागाकडे लेखी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारींची तात्काळ गंभीर दखल घेत कोरेगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समीर टकले यांनी पिंपोडे बुद्रुक येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता, ३ नोव्हेंबर रोजी हे दोघेही स्वतःच्या दवाखान्यांमध्ये रुग्णांवर उपचार करत असताना रंगेहाथ पकडले गेले. या अचानक झालेल्या कारवाईमुळे त्यांच्या अवैध वैद्यकीय व्यवसायाचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समीर टकले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन्ही संशयितांवर विनापरवाना व अनधिकृतपणे व्यवसाय करून निष्पाप नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या या धडक कारवाईमुळे कोरेगाव तालुक्यासह ग्रामीण भागात अवैधरीत्या प्रॅक्टिस करणाऱ्या बोगस डॉक्टरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी राज्यव्यापी लढा उभारणार : डॉ. भारत पाटणकर

संबंधित बातम्या