सांगलीच्या पोलिसाची पाटणमध्ये अरेरावी; खासगी कारवर ‘पोलीस’ पाटी लावून दादागिरी करणाऱ्याला तरुणांनी घेतले चांगलेच फैलावर

by Team Satara Today | published on : 14 September 2026


पाटण : गणेशोत्सवाच्या गर्दीत एका कारला धडक देऊन उलट दादागिरी करणाऱ्या सांगली पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला पाटणमधील तरुणांनी चांगलाच धडा शिकवला. खाकीचा रुबाब दाखवणाऱ्या या पोलिसाची तरुणांनी भरचौकात खरडपट्टी काढली असून, या हायव्होल्टेज ड्राम्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
पाटण शहरात रविवारी १३ तारखेला गणेशोत्सवाची मोठी लगबग सुरू होती. विविध गणेश मंडळांचे देखावे, मोठ्या मूर्तींची ने-आण करणारे ट्रॅक्टर-ट्रॉलर आणि घरगुती गणपती घेऊन जाणाऱ्या नागरिकांमुळे शहरातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. याच दरम्यान विरुद्ध दिशेने आलेल्या एका चारचाकी कारने स्थानिक तरुणांच्या कारला जोरात धडक दिली. या अपघातात तरुणांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. नुकसान पाहून कारमधील तरुणांनी संबंधित कारचालकाला जाब विचारला असता, कारमधून उतरलेल्या व्यक्तीने स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी उलट अरेरावी सुरू केली. “मी सांगली पोलीस दलात आहे, माझे काय करायचे ते करा, मी कसलीही भरपाई देणार नाही,” असा दम भरत त्याने तरुणांवर खाकीचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र, या दादागिरीसमोर न झुकता तरुणांनीही बाणेदारपणा दाखवत त्या पोलिसाला जागेवरच खडसावले. खासगी वाहनावर ‘पोलीस’ अशी पाटी कशी लावली, असा थेट सवाल करत या तरुणांनी संबंधित कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. भररस्त्यात सुरू झालेला हा वाद पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद होऊन समाजमाध्यमांवर वेगाने पसरल्याने दिवसभर शहरात याच विषयाची चर्चा रंगली होती.
उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आणि राज्य पोलीस महासंचालकांचे परिपत्रक असतानाही खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ पाटी लावण्यास कायद्याने सक्त मनाई आहे. मात्र, तरीही नियमांना पायदळी तुडवून खाजगी गाड्यांवर पोलिसांची पाटी लावून रुबाब झाडणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई करणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हॉटेलच्या बिलावरून झालेल्या वादातून खंडाळ्यात युवकावर चाकूने हल्ला; मुख्य संशयिताला पोलीस कोठडी
पुढील बातमी
गणेशोत्सवात मोती चौकावर 'खाकी'ची नजर; पालकमंत्र्यांकडून पाहणी; नियोजनाचा आढावा; पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची उपस्थिती

संबंधित बातम्या