झारखंड लोकसेवा आयोगाच्‍या भरती परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी आक्रमक; बॅरिकेड्स तोडून झारखंड विधानसभेकडे कूच

by Team Satara Today | published on : 10 August 2026


दिल्ली : झारखंड लोकसेवा आयोगाच्‍या भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहार व पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी आज (दि. १० ऑगस्‍ट) विधानसभेला घेराव घालण्‍याचा निर्धार केला आहे. विधानसभेवर मोर्चा काढणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स केली आहे. तरीही, विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स ओलांडून पुढे कूच केले आहे. एकूण सहा बॅरिकेड्स पैकी तीन बॅरिकेड्स तोडण्‍यात आली आहेत.

विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडून विधानसभेकडे कूच

विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स ओलांडून पुढे कूच केले आहे. आपण शांततापूर्ण मार्गाने विधानसभेच्या दिशेने मोर्चा काढत असल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे (JLKM) नेते देवेंद्रनाथ महतो ॲम्बुलन्सने धुर्वा गोलचक्कर येथे पोहोचले. त्यानंतर ते ॲम्बुलन्सनेच विधानसभेच्या दिशेने रवाना झाले. देवेंद्रनाथ महतो आता इतर आंदोलक विद्यार्थ्यांसोबत विधानसभा मोर्चात सहभागी होणार आहेत.एकूण सहा बॅरिकेड्स पैकी तीन बॅरिकेड्स तोडण्‍यात आली आहेत. पोलिसांकडून पाण्‍याचे फवारे मारुन आंदोलकांना पांगविण्‍याचे प्रयत्‍न केले जात आहेत.

काय आहेत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या?

रांचीच्या जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर गेली १७ दिवस आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली आहे. याशिवाय २०१९ नंतर आयोजित केलेल्या सर्व JSSC CGL, JSSC JE आणि PGT परीक्षा रद्द कराव्यात आणि राज्य सरकारच्या नोकरभरती प्रक्रियेत सुधारणा करावी, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.परीक्षांमधील गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, वर्गनिहाय (Category-wise) कटऑफ जारी करणे, ओएमआर (OMR) प्रत व रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देणे तसेच यूपीएससी आणि एसएससीच्या धर्तीवर नियमित भरती कॅलेंडर प्रसिद्ध करणे याही विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. या मागण्यांवर अद्याप पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

सरकारचा दावा- ९८ टक्के मागण्या मान्य; विद्यार्थ्यांनी फेटाळला

झारखंड सरकारकडून विद्यार्थ्यांच्या सुमारे ९८ टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा करण्यात आला. मात्र, विद्यार्थ्यांनी सरकारचा हा दावा चुकीचा असल्याचे सांगत फेटाळून लावला. आपल्या प्रमुख मागण्यांवर अजूनही सहमती झालेली नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. परीक्षा रद्द करणे आणि कथित गैरव्यवहारांची चौकशी यांशी संबंधित मुख्य मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घेतलेला नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

उपोषणाला बसलेले देवेंद्रनाथ महतो म्हणाले, 'आज क्रांतीचा दिवस'

छात्र नेते देवेंद्रनाथ महतो यांनी 'आयएएनएस' वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, "आज उपोषणाचा नववा दिवस असून मला कमालीचा अशक्तपणा आला आहे. माझी प्रकृती अधिकच खालावत चालली आहे. परंतु, मला सध्या जो त्रास आणि वेदना होत आहेत, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वेदना पेपर लीक झाल्यामुळे होत आहेत." विधानसभा घेरावाबद्दल बोलताना देवेंद्रनाथ महतो म्हणाले, "आज क्रांतीचा दिवस आहे. आपल्या महिन्यांच्या संघर्षाचा हा दिवस आहे."



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विद्यार्थी आंदोलनाचा भडका उडाल्‍यानंतर झारखंड सरकारची मोठी कारवाई; झारखंड लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्षांना अटक
पुढील बातमी
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न; अफवांवर विश्वास ठेवू नका, मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन, कवठेमहांकाळ येथे सभा

संबंधित बातम्या