सातारा : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकार्यांची महत्त्वपूर्ण बैठक सातार्यात पार पडली. या बैठकीत निवडणुकीसंदर्भातील सर्व मते आणि सूचना पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवून अंतिम निर्णय वरिष्ठ स्तरावर घेण्यात यावा, अशी भूमिका सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडली. या बैठकीमध्ये सर्व सदस्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या. तसेच या भावना जशाच्या तशा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळविण्यात येऊन त्यांचा निर्णय मतदानापूर्वी सर्व सदस्यांना कळविला जाईल, अशी ग्वाही देसाई यांनी दिली.
हॉटेल लेक व्ह्यू येथे झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक सदस्याचे मत जाणून घेण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत व्यक्त झालेल्या सर्व भावना आणि सूचना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठविण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, ज्येष्ठ नेते संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह भोसले तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकार्यांनी पक्ष नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत, वरिष्ठांकडून जो निर्णय जाहीर केला जाईल त्यानुसार सर्वजण संघटितपणे काम करतील, असे स्पष्ट केले. आगामी निवडणुकीत पक्षाची भूमिका आणि मतदानाची दिशा याबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, या निवडणुकीच्या प्रक्रियेत महायुतीतील समन्वय कायम ठेवण्यावर भर देण्यात आला. घटक पक्षांमधील संवाद आणि सहकार्याच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची भूमिका बैठकीत अधोरेखित करण्यात आली. पक्षांतर्गत शिस्त आणि संघटनात्मक एकजूट याबाबतही नेत्यांनी सकारात्मक संकेत दिले.
अलीकडील काळात संघटनात्मक नियुक्त्यांवरून निर्माण झालेल्या मतभेदांच्या चर्चेलाही बैठकीत पूर्णविराम मिळाल्याचा दावा करण्यात आला. वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रितपणे पक्षबांधणीसाठी काम करत असल्याचे सांगण्यात आले.
विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदार आणि मतदान केंद्रांची तयारी पूर्णत्वाकडे जात असून, पक्षाची सर्व मते एकसंध राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.