सातारा : सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय्य दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी दोन दिवसांत कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे ऊसदर जाहीर करावा, अन्यथा कारखानानिहाय बेमुदत ऊस वाहतूक बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला असून खत-बियाणे, डिझेल, मशागत आणि मजुरीच्या खर्चाने शेतीचे आर्थिक गणित बिघडले आहे. दुसरीकडे साखर, इथेनॉल, वीज आणि उपपदार्थांमधून कारखान्यांना उत्पन्न मिळत असताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला का मिळत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जिल्ह्यातील कारखानदार राजकीय सत्तेसाठी एकमेकांचे विरोधक असतात; मात्र ऊसदराचा प्रश्न आला की एकत्र येतात. वजनदार मंर्त्यांच्या दबावाखाली शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असे शेळके यांनी सांगितले. सहकारी कारखान्यांच्या संचालकांना शेतकऱ्यांना योग्य दर देता येत नसेल तर राजीनामे देण्याचे आव्हानही त्यांनी दिले.
सर्व कारखानदारांनी कोल्हापूर पॅटर्ननुसार टप्प्याटप्प्याने दर जाहीर करून गळीत हंगाम सुरळीत सुरू करावा. दोन दिवसांत समाधानकारक निर्णय न झाल्यास बेमुदत ऊस वाहतूक बंद आंदोलन केले जाईल. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी संघटना शेवटपर्यंत लढेल, असा निर्धार राजू शेळके यांनी व्यक्त केला.
ऊसदरासाठी 'स्वाभिमानी'चा एल्गार; दोन दिवसांत कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे ऊसदर जाहीर करावा, अन्यथा वाहतूक बंद आंदोलन, राजू शेळके यांचा इशारा
by Team Satara Today | published on : 12 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा