सातारा : संपूर्ण महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत. मुंबई, पुणे, लातूर, अकोला, बदलापूर अशा विविध शहरांमध्ये लहान मुली व महिलांना अत्याचारांना तोंड द्यावे लागत आहे. या घटनांकडे राज्य शासनाने संवेदनशीलपणे लक्ष दिले पाहिजे. याकरता ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी सातारा यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यावर धरणे आंदोलन करण्यात आले.
या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना देण्यात आले. वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, जिल्हा महासचिव गणेश भिसे यांच्यासह संदीप कांबळे, पल्लवी काकडे, माया कांबळे, लक्ष्मीबाई कांबळे, शशिकांत गंगावणे, सुरेश बैले, अधिकराव सोनवणे,आबा बैले, शहाजी किर्दत, मोहम्मद पालकर, सायली भोसले यांनी या आंदोलनात भाग घेतला होता.
या निवेदनात नमूद आहे की, बदलापूर येथील चिमुरडीवर अत्याचार करणार्या आरोपीवर फास्टट्रॅक कोर्टात खटला सुरू करून एक वर्षाच्या आत फाशी द्यावी, बदलापूरच्या पीडित कुटुंबांना महिला बालकल्याण विभागाच्या वतीने 50 लाख रुपये रक्कम देण्यात यावी, संबंधित शिक्षण संस्था संचालक यांच्यावर गुन्हे दाखल करून संस्थेची मान्यता रद्द करावी, संभाजीनगर येथील प्रवचनाच्या दरम्यान रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केले. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. हिंदू-मुस्लिम ऐक्य बिघडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार्या रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करावा, कोलकत्ता येथील डॉक्टरचे शिक्षण घेणार्या तरुणीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेतील आरोपींना खटला चालवून तात्काळ फाशी द्यावी, अशा विविध मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. या आंदोलनादरम्यान लाडकी नको सुरक्षित बहीण हवी, अशा आशयाचे फलक झळकविण्यात आले.
या मागण्यांच्या संदर्भात संवेदनशील विचार व्हावा तसेच समाजामध्ये जाणीवपूर्वक जनजागृती करण्यात यावी. अन्यथा येत्या काळामध्ये तीव्र स्वरूपाची आंदोलन उभे राहावे लागेल. त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.
महिला अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन
by Team Satara Today | published on : 22 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा