परतीच्या प्रवासात माउलींचा पाडेगाव मुक्काम; टाळ-मृदुंगाच्या गजरात व फुलांच्या वर्षावात उत्स्फूर्त स्वागत, दर्शनासाठी भाविकांची गर्दी

by Team Satara Today | published on : 03 August 2026


लोणंद : आषाढी वारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज व इतर संतांच्या पालख्या आता परतीच्या प्रवासाला लागल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील परतीच्या प्रवासातील शेवटचा मुक्काम सोमवारी पाडेगाव येथे झाला. माउलींच्या आगमनानंतर पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

तरडगाव येथून दुपारी मार्गस्थ झालेला पालखी सोहळा लोणंद येथील अहिल्याबाई होळकर स्मारक चौकात अल्प विश्रांतीसाठी थांबला. यावेळी अनेक भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. त्यानंतर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पालखी पाडेगाव पाटी येथे दाखल होताच ग्रामस्थांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात व फुलांच्या वर्षावात उत्स्फूर्त स्वागत केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य गिरीष बनकर, सरपंच राहुल कोकरे, उपसरपंच प्रियांका खरात, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव खरात, रेखाताई बाबासाहेब खरात, वसंतराव मोरे, बाबासाहेब खरात, हणमंतराव मोहिते, अनिकेत जगताप, सूर्यकांत खरात, बिपीन मोहिते, प्रवीण ढावरे, माजी सरपंच स्मिता खरात, राजेश खरात, ग्रामविकास अधिकारी हैबत ढोपे, प्रभाकर नेवसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागतानंतर पालखीचा रथ बैलजोडीच्या साहाय्याने प्राथमिक शाळेपर्यंत आणण्यात आला. तेथून गावकऱ्यांनी पालखी खांद्यावर घेत दुतर्फा रांगोळीने सजविलेल्या मार्गाने माऊली सभागृहापर्यंत नेली. आरतीनंतर माउलींचा मुक्काम पाडेगाव येथे झाला. सोमवारी (दि. ३) सकाळी पालखी निरेच्या दिशेने मार्गस्थ होणार असल्याची घोषणा करण्यात आली. पंढरपूरकडे जाताना लोणंद मुक्कामादरम्यान मोठी गर्दी होत असल्याने खंडाळा, फलटण तसेच परिसरातील अनेक भाविक परतीच्या प्रवासात पाडेगाव येथेच माउलींचे दर्शन घेण्यासाठी येतात. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची रांग सुरू राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, वारकऱ्यांची दरवर्षी होणारी गैरसोय लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने यंदाही फिरती शौचालये व स्नानगृहांची व्यवस्था केली आहे. तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था व अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने वारकरी व भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. ही व्यवस्था वारकऱ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यात धर्मांतरविरोधी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत मंजूर; जबरदस्‍तीने धर्मांतरासाठी १० वर्षांपर्यंत कारावास
पुढील बातमी
साताऱ्यात गणेश आगमन सोहळ्यात ‘डीजे’ला बंदी, पोलिस प्रशासनाचा निर्णय, आगमन सोहळ्याच्या मिरवणुकांसाठी पाच दिवसांची मुभा

संबंधित बातम्या