सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी येथील वादग्रस्त जमीन खरेदी व्यवहार प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी दिली.
झाडाणी प्रकरण उघडकीस आणले होते. गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे आणि त्यांच्या नातेवाइकांनी झाडाणी येथील तब्बल 620 एकर जमीन बळकवल्याचे प्रकरण सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी कागदपत्रांवरून उघडकीस आणले होते. या प्रकरणाची चौकशी व सुनावणीसाठी अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांची 6 नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार नियुक्ती करण्यात आली होती. चंद्रकांत वळवी, संगीता चंद्रकांत वळवी, अरमान चंद्रकांत वळवी, आदित्य चंद्रकांत वळवी यांना योग्य कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची नोटीस 26 नोव्हेंबर रोजी बजावण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या सुनावणीस वळवी आणि कुटुंबीय अनुपस्थित होते. त्यामुळे याबाबत दि. 15 डिसेंबर रोजी सुनावणी घेण्यात येईल, असे मल्लिकार्जुन माने यांनी सांगितले होते.
या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, याबाबतचा अहवाल शासनाला पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती सुशांत मोरे यांनी दिली. दरम्यान, चंद्रकांत वळवी व अनिल वसावे यांची अन्य जिल्ह्यात जमीन असून, महाराष्ट्र कमाल जमीन धारणा कायदा 1961 च्या कलम 14 नुसार त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा स्तरावर नसल्याने, या दोघांबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.