सातारा : स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मनिरपेक्ष राष्ट्रनिर्मितीमध्ये मौलिक योगदान आहे. असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनकर झिंब्रे यांनी व्यक्त केले.
संबोधी प्रतिष्ठान व बौद्ध विकास मंडळ, विजयनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती महोत्सवात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे माजी अधिकारी प्रकाश गायकवाड होते. विचार मंचावर सरपंच सुनीता चंदनशिवे, संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश इंजे, कार्यवाह ॲड. हौसेराव धुमाळ, केशवराव कदम, प्राचार्य डॉ. संजय कांबळे, डॉ. सुवर्णा यादव, प्रा. प्रशांत साळवे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य बुवाबाजी संघर्ष विभागाचे सदस्य भगवान रणदिवे व माजी पोलीस निरीक्षक संभाजी भोसले उपस्थित होते.
दिनकर झिंब्रे म्हणाले, "रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन्ही महापुरुष समाजाचे वर्तमानातील प्रेरणादायी सजीव शक्ती बनले आहेत. त्यांच्या अपहरणाचा धोका निर्माण झाला आहे. बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय या मूल्यावर आधारित शोषणमुक्त समाज निर्मितीचे स्वप्न पाहिले. त्यांनी लोकशाही, प्रजासत्ताक भारत घडविण्याचे मौलिक काम राज्यघटनेद्वारे केले आहे. या राज्यघटनेच्या मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी सजग नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे."
याप्रसंगी रमेश इंजे, प्राचार्य संजय कांबळे, डॉ. सुवर्ण यादव, प्रा. प्रशांत साळवे यांनी बाबासाहेबांचे योगदानावर मनोगते व्यक्त केली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते भगवान रणदिवे यांनी ' चमत्काराची दुनिया, विज्ञानाची किमया ' हा कार्यक्रम सादर केला. त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.
दिनकर झिंब्रे यांनी सुनीता चंदनशिवे, विजयनगर बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष विलास गायकवाड, उपाध्यक्ष विश्वास गायकवाड, सचिव अरविंद गायकवाड, माजी पोलीस निरीक्षक संभाजी भोसले आदी मान्यवरांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे स्मृतिचिन्ह याप्रसंगी प्रदान केले.
कार्यक्रमास ट्रेझरी ऑफिसर विनोद यादव, पाली भाषेचे शिक्षक धम्म प्रचारक प्रसाद गायकवाड तसेच महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.