सातारा : जर्मनीत नुकत्याच झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत (World University Games) साताऱ्याच्या साहिल जाधव याने तिरंदाजीमध्ये पुरुषांच्या कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. अंतिम फेरीतील रोमांचक सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या अजय स्कॉटला 149-147, अशा फरकाने पराभूत केलं. साहिल हा साताऱ्यातील दृष्टी आर्चरी अकॅडमीचा खेळाडू आणि यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजचा विद्यार्थी आहे.
जागतिक विद्यापीठ स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. यंदा जर्मनीत झालेल्या स्पर्धेसाठी पाच दिवस संघ निवड प्रक्रिया चालली. त्यात साहिल जाधवने देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर तिरंदाजीच्या कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावत देशवासियांची अपेक्षापूर्ती केली. अटीतटीच्या परिस्थितीत दबाव असतानाही एकाग्रतेने निर्दोष खेळीद्वारे साहिलने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून सर्वांची मने जिंकली.
सातारच्या करंडी गावचा सुपुत्र साहिल राजेश जाधव याने जागतिक विद्यापीठ स्पर्धा २०२५ मध्ये पुरुषांच्या वैयक्तिक आर्चरी ( धनुर्विद्या ) प्रकारात सुवर्णपदक आणि संघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. त्याच्या कठोर मेहनतीला आणि जिद्दीला सलाम. साहिलने आपल्या दर्जेदार खेळाने भारताचं, महाराष्ट्राचं आणि साताऱ्याचं नाव उज्ज्वल केलं आहे, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी साहिलच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
साहिल जाधव हा अत्यंत गुणी तिरंदाज आहे. तिरंदाजीतील एखादी शिकवलेली गोष्ट तो लगेच आत्मसात करायचा. साहिल हा सामान्य कुटुंबातील आहे. त्याची आई शिक्षिका आहे तर वडील खासगी कंपनीत होते. यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये तो बीएससीचे शिक्षण घेत आहे. साहिलला आता खेलो इंडिया आणि ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी करण्याचा आमचा प्रयत्न असेल. - प्रवीण सावंत, प्रशिक्षक
साताऱ्यातील दृष्टी आर्चरी अकॅडमीत प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्येचे धडे गिरवणाऱ्या पाच खेळाडूंनी जागतिक स्तरावर यशाचा झेंडा रोवला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आदिती स्वामी, ओजस देवतळे, प्रथमेश फुगे, मधुरा धामणगावकर आणि साहिल जाधव यांनी सुवर्णपदके पटकावली आहेत.