विविध प्रश्नांसाठी जिल्ह्यातील सरपंच एकवटले

सोमवार दि.३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देणार

सातारा : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख, मिर्झापूरचे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा देऊन न्याय मिळाला पाहिजे. तर सरपंच, उपसरपंच, सदस्यांना मानधन आणि सरपंचांना पेन्शन मिळावी, यासाठी सातारा जिल्ह्यातील सरपंच परिषदेचे सदस्य असलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य एकवटले आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना  सोमवार दि.३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा.  निवेदन देणार आहेत.

राज्यात ग्रामविकासासाठी अव्याहत सक्रिय योगदान देणाऱ्या सरपंच परिषदेने अनेक प्रश्नांवर आवाज उठवत शासनाला अपेक्षित काम केले आहे. याच सरपंच परिषदेने कै. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोग येथे राज्यभरातील तब्बल ५०० हून अधिक सरपंचांना कुटुंबांना भेटून आधार देत या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी सोबत राहण्याची ग्वाही दिली आहे. तर कै.सोमनाथ सुर्यवंशी मार्जापूर (परभणी) येथे जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना आधार देत कायम पाठीशी असल्याचे सांगितले.

आता या दोन्ही प्रकरणाचा तपास लवकर होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील सरपंच परिषदेकडून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे.

त्याच बरोबर सरपंच, उपसरपंच, सदस्यांच्या मानधन भत्ता प्रश्न आणि सरपंचांना पेन्शन मिळावी, या प्रलंबित मागण्यासाठी यावेळी निवेदन देण्यात येणार असल्याचे मार्गदर्शक शंकर बापू खापे, मंदाकिनी सावंत, सुरेखा डुबल, संतोष शेळके, सतीश इंगवले, प्रताप चव्हाण, अमर माने, विष्णू गायकवाड, आदींनी जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

मागील बातमी
कायमस्वरूपी करमाफी, लाईट, पाणी फुकट असलेले गाव मान्याचीवाडी
पुढील बातमी
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या संकल्पनासाठी कृतीवर भर द्यावा : याशनी नागराजन

संबंधित बातम्या