सातारा : दरवर्षी राज्यात 1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने सातारा तालुक्यात महसूल सप्ताहाचे 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या साप्ताहात नागरिकांना हितावह ठरतील असे विविध उपक्रम राबवण्यात येणार असून या महसूल सप्ताहाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा तालुक्याचे तहसिलदार समीर यादव यांनी केले आहे.
नागरिकांमध्ये जागरुकता वाढवून शासनाबद्दल व महसूल विभागाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी महसूल सप्ताहामध्ये उपविभागीय अधिकारी आशिष बारकूल यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुक्यात पुढील उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट, २०२५ रोजी महसूल विभागातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांचे संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उत्कृष्ट काम करणा-या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरीत करण्यात येत आहे. 2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटूंबांना या अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यकमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 3 ऑगस्ट रोजी पाणंद, शिवरस्ते मोजणी करुन अतिक्रमणमुक्त करणे व त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत. 4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळामध्ये राबविण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची घरभेटी देऊन डीबीटी करून अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे. 6 ऑगस्ट शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व शासननिर्णयानुसार शर्तभंग जमिनींबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. 7 ऑगस्ट रोजी एम-सॅण्ड धोरणाची अमंलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेण्याचा कार्यक्रम राबवून महसूल सप्ताहाची सांगता समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.