मधुसूदन मोहिते यांना 'कै. रावबहादूर संभाजीराव मोरे दुदुस्कर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार' प्रदान; ज्ञान हेच वैचारिक उत्क्रांतीचे मूळ साधन : कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के

by Team Satara Today | published on : 30 September 2026


सातारा : सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने श्री गाडगे महाराज मिशनचे अध्यक्ष मधुसूदन मोहिते यांना 'कै. रावबहादूर संभाजीराव मोरे दुदुस्कर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार' प्रदान करण्यात आला. येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात संस्थेचा वर्धापन दिन आणि चेअरमन जयेंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सोहळा पार पडला. या दुहेरी औचित्याने महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी, वंचित घटकांच्या शिक्षणाचे व्रत हेच मानवकल्याणाचे खरे कार्य असल्याचे स्पष्ट केले. अज्ञानाच्या अंधकारात पिचलेल्या पिढीला मुख्य प्रवाहात आणण्याचे मोलाचे काम सातारा मराठा विद्या प्रसारक समाज आणि गाडगे महाराज मिशन या दोन्ही संस्थांनी केले आहे, असे सांगत त्यांनी मधुसूदन मोहिते यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला.
सत्काराला उत्तर देताना मधुसूदन मोहिते यांनी, राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हेच आपले जीवनव्रत असल्याचे नमूद केले. आश्रमशाळांच्या माध्यमातून नवी पिढी विज्ञाननिष्ठ, विवेकवादी आणि मानवतावादी दृष्टिकोनातून घडवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे चेअरमन जयेंद्र चव्हाण यांनी, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने कै. रावबहादूर संभाजीराव मोरे दुदुस्कर व श्रीमंत रुद्राजीराजे महाडीक यांनी सुरू केलेले बहुजन शिक्षणाचे कार्य संस्था अविरत पुढे नेत असल्याचे सांगितले.
प्राचार्य डॉ. संजय सावंत यांनी प्रास्ताविकातून संस्थेचा ऐतिहासिक प्रवास आणि सामाजिक प्रबोधनाची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे मानपत्र लेखन गौतम काटकर यांनी केले, तर वाचन डॉ. प्रकाश कांबळे यांनी केले. या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष रघुनाथराव मोटे, व्हाईस चेअरमन प्रवीण चव्हाण, निलेश मोरे-दुदुस्कर, विश्वनाथ नाचवणे, प्रज्वल दुदुस्कर, उपप्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड यांच्यासह विदर्भ, खानदेश, मुंबई परिसरातील कार्यकर्ते, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भरत जाधव यांनी केले, तर आभार प्रज्ज्वल मोरे यांनी मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लोकनेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्हा कार्यालयात अभिवादन

संबंधित बातम्या