सातारा : सातारा-रहिमतपूर रस्त्यावरच्या अंगापूर फाट्याजवळ गुरुवारी दुपारी विचित्र आणि भयभीत करणारी घटना घडली. रस्त्यावरून कुत्र्यासारखे वर्तन करत एक तरुण वाहनांच्या दिशेने धाव घेत असल्याचे दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तत्परता दाखवत जाळ्याच्या सहाय्याने त्याला नियंत्रणात घेतले आणि तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. दरम्यान, तो युवक मनोरुग्णच असल्याचा निर्वाळा जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी दिला आहे.
याबाबत स्थानिकांनी दिलेली माहिती अशी, गोपाल भील (वय २३, रा. शहादा, जि. नंदुरबार) हा युवक ऊसतोड कामगारांच्या एका तुकडीबरोबर येथे आला होता. अचानक दुपारी तो रस्त्याच्या मध्यभागी दोन्ही हात आणि गुडघ्यावर रांगू लागला. त्याच्याजवळ कोणी गेलं तरी तो अक्षरश: कुत्र्यासारखा गुरगुरत त्यांच्या दिशेने धावून जात होता.
दुचाकीस्वारांच्या दिशेने उडी मारणे, रस्त्यात वेड्यासारखे फिरणे, कधी दोन्ही गुडघ्यांवर बसून तोंडातून जीभ बाहेर काढणे. या विचित्र हालचालींमुळे नागरिकांची भांबावलेली अवस्था झाली. काहींनी भीतीपोटी अंतर राखले तर काहींनी त्याला पकडण्यासाठी वाघरीच्या सहाय्याने प्रयत्न सुरू केले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर क्षणोक्षणी मोठया प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची उत्सुकता ताणली जावू लागली होती. दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता काही नागरिकांनी जाळ्याचा वापर करून तरुणाला सुरक्षितपणे पकडले. यानंतर त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिकांनी असा अंदाज व्यक्त केला की, पंधरा दिवसांपूर्वी कुत्र्याने चावा घेतल्यापासून त्याने उपचार न केल्यामुळे कदाचित रेबीजची लक्षणे दिसत असावीत.
या घटनेदरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले. काहींनी तरुणाला मानसिक धक्का बसल्याचा अंदाज व्यक्त केला तर काहींनी सोशल मीडियावरील व्हिडिओंमधून त्याच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली.
रेबीजची कोणतीही लक्षणे नाहीत
या बाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी माहिती दिली की, ''रेबीज झालेल्या व्यक्तीला पाणी पिणे अवघड असते. याशिवाय त्याला श्वास घेणेही मुश्किल होत असते. पण याबाबत तशी कोणतीही लक्षणे या तरुणामध्ये आढळलेली नाहीत. हा तरुण मनोरुग्ण आहे. मात्र तरीही त्याच्या प्रत्येक हालचालींवर डॉक्टर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
-डॉ. युवराज करपे, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा.