स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत (सातारा) : राज्यकर्त्यांनी साहित्य संस्थांमध्ये हस्तक्षेप करू नये, अशी मागणी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून व्यक्त होत असली तरी कोणत्याही राजकारण्यांनी तो प्रयत्न केलेला नाही. त्या उलट साहित्य संमेलनाची आणि साहित्य संस्थांची ताकद वाढवण्याचे काम राज्यकर्ते करीत आहेत, अशी भूमिका राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मांडली.
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यामध्ये उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी संवाद साधताना मोजक्या शब्दांत आढावा घेतला.
ग. दि. माडगुळकर यांच्या नावाने माजी संमेलनाध्यक्षांना सन्माननिधी..
उदय सामंत म्हणाले, साहित्य संमेलनासाठी पूर्वी ५० लाख रुपयांचा निधी सरकारतर्फे दिला जात होता. परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ती रक्कम दोन कोटी रुपये केली. मागील वर्षापासून त्यात भर घालून साहित्य संमेलनासाठी ३ कोटी रुपये द्यायचे ठरवले. या शिवाय, पुढील वर्ष हे साहित्य संमेलनाचे १०० वे वर्ष आहे हे लक्षात घेऊन आजवरच्या १०० संमेलनाध्यक्षांना ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने सन्माननिधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच १००व्या संमेलनाचे जे अध्यक्ष असतील त्यांना महादजी शिंदे यांच्या नावाने वर्षभर सन्माननिधी देण्यात येणार आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नावाने स्मारक उभे करण्यासाठी एमआयडीसीतर्फे जमिन प्राप्त केली आहे. ते काम लवकरच सुरू होणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती पुढील वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे. सहा वर्षांपूर्वी साहित्य परिषदेच्या इमारतीच्या डागडुजीसाठी ५० लाख रुपये मंजूर केले होते. आज त्यात भर घालून १ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. राज्यकर्ते साहित्य संस्था व मराठी भाषेच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि ते साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करत नाहीत. या उलट मराठी भाषेसाठी जे जे करावे लागेल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले. १ कोटी रुपयांचा हा धनादेश एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.