अनिल देसाई, संदीप मांडवेंवर अपहरणाचा गुन्हा; आपले अपहरण झालेच नाही : दिनकर शिंदे

by Team Satara Today | published on : 21 March 2026


सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी झेडपी सदस्य अनिल देसाई, संदीप मांडवे यांची पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने (एलसीबी) अक्षरश: उचलाउचली केली. या दोघांसह एकूण चौघांवर महाबळेश्वरमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेच्या अभूतपूर्व गोंधळप्रकरणी ज्यांच्या अनुषंगाने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली ते दिनकर शिंदे यांची कोणतीही तक्रार नसल्याचे म्हणणे आहे. पोलिस ठाण्यातील तक्रारीनंतर त्यांनी स्वत:हून तसा जबाब काही तासांत दिला. त्यात त्यांनी आपले अपहरण झाले नसल्याचे म्हटले आहे. 

राजेंद्र राजपुरे, अनिल देसाई, भैया डोंगरे, संदीप ऊर्फ पिंटू मांडवे यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विकास दिनकर शिंदे (वय 45, रा. सोनगिरवाडी, ता.वाई) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

विकास शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे वडील बापूसाहेब उर्फ दिनकर महादेव शिंदे हे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये यशवंतनगर जिल्हा परिषद गटामधून निवडून आले आहेत. माझ्या वडिलांना सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर 15 दिवसांपूर्वी काहीजण घेऊन गेले होते. ते नेमके कुठे आहेत, हे माहिती नव्हते. दि. 18 मार्च रोजी वडील दिनकर शिंदे हे महाबळेश्वर येथील रेडबटन हॉटेल येथे असल्याचे समजले. रेडबटन हॉटेल येथे संध्याकाळी 6 वाजता त्यांना ते भेटले. त्यावेळी वडिलांसोबत राजेंद्र राजपुरे, अनिल देसाई, भैया डोंगरे, संदीप ऊर्फ पिंटू मांडवे होते, असे तक्रारीत म्हटले आहे.

विकास शिंदे यांनी वडिलांशी एकांतात भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित चौघेजण त्यांच्या वडीलांना एकांतात भेटू देत नव्हते. अखेर तक्रारदार विकास शिंदे त्या चौघांची नजर चुकवून वडिलांना भेटले. यावेळी वडीलांनी राजेंद्र राजपुरे, अनिल देसाई, भैय्या डोंगरे, संदीप ऊर्फ पिंटू मांडवे यांनी त्यांच्या इच्छेविरुद्ध येथे हॉटेलमध्ये डांबून ठेवल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या इच्छेविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात व डांबून ठेवतात. तसेच ही बाब जर घरच्यांना किंवा इतराना सांगितली तर तुमच्या जीवाचे बरेवाईट करू, अशी संबंधितांनी धमकी दिली असल्याचे सांगितले. वडिलांनी अशी माहिती दिल्यानंतर तक्रारदार विकास शिंदे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. मध्यरात्री तक्रार दिल्यानंतर तो गुन्हा झिरोने महाबळेश्वर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सातारा एलसीबीने करण्यास सुरुवात केली. या प्रकरणातील झेडपी सदस्य अनिल देसाई, संदीप मांडवे हे जिल्हा परिषदेमध्ये येणार असल्याचे समजले. त्यानुसार एलसीबीने झेडपीमध्ये फिल्डींग लावली. अनिल देसाई व संदीप मांडवे हे दोघे मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील यांच्यासोबत होते. त्यावेळी पोलिसांनी अनिल देसाई व संदीप मांडवे यांच्यावर झडप घातली. यावेळी एकच गोंधळ उडाला. मंत्र्यांना झुगारुन पोलिसांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता या दोघांनाही ताब्यात घेतले. यावेळी दोन्ही मंत्र्यांना धक्काबुक्कीही झाली. दोन्ही मंत्री बाजूला झाल्यानंतर पोलिस पाठीमागील बाजूने देसाई व मांडवे या जिल्हा परिषद सदस्यांना घेवून महाबळेश्वरकडे रवाना झाले.

महाबळेश्वर येथे दोघा जिल्हा परिषद सदस्यांना अटक करण्याच्या अनुषंगाने आरोग्य तपासणी करण्यासाठी एलसीबी पोलिस त्यांना घेवून गेले. मात्र तेथे बीपी हाय असल्याने पुन्हा रुग्णवाहिकेद्वारे दोघांना साताऱ्यात आणण्यात आले.

आपले अपहरण झालेच नाही: दिनकर शिंदे

सातारा जिल्हा परिषदेच्या अभूतपूर्व गोंधळप्रकरणी ज्यांच्या अनुषंगाने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली ते दिनकर शिंदे यांची कोणतीही तक्रार नसल्याचे म्हणणे आहे. पोलिस ठाण्यातील तक्रारीनंतर त्यांनी स्वत:हून तसा जबाब काही तासांत दिला. त्यात त्यांनी आपले अपहरण झाले नसल्याचे म्हटले आहे. मात्र तरीही पोलिसांनी अपहरणाची तक्रार दाखल करून पुढील अटकेची कारवाई केली. वास्तविक आपली कोणतीही तक्रार नसल्याचा पोलिसांना जबाब दिला असल्याचे शिंदे यांचे म्हणणे आले आहे. दरम्यान, मंत्री मकरंदआबा पाटील यांनी देखील या घटनेचा प्रतिक्रिया देताना उल्लेख केला आहे. तक्रार गैरसमजातून दाखल झाल्यानंतर पोलिसांना सांगण्यात आले. मात्र तरीही पोलिसांनी पुढे चुकीची कारवाई केली, असा आरोप त्यांनी केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरात रमजान ईद उत्साहात; जामा मशीद येथून ईदगाहपर्यंत जुलूस, शांतता, समृद्धीसाठी विशेष प्रार्थना
पुढील बातमी
धरणांतील पाणीसाठा जूनऐवजी थेट 31 ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याचा निर्णय; मान्सून कमी पडण्याचा अंदाज हवामान खात्याचा अंदाज

संबंधित बातम्या