जिल्हा बँक ठरावांसाठी सत्तेचा गैरवापर; आमदार रोहित पवारांचा भाजपवर घणाघात

by Team Satara Today | published on : 23 August 2026


सातारा  : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजूने करून घेण्यासाठी भाजप आणि त्यांच्यासोबत गेलेले नेते सत्ता, पैसा व दहशतीचा गैरवापर करत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुरोगामी विचारांच्या कुटुंबातून आलेल्या नेत्यांना भाजपची सवय लागल्यामुळे जिल्ह्यात दहशतीचे राजकारण सुरू असल्याचे पाहून वाईट वाटते, अशी खंतही त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

​जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार पवार म्हणाले की, सोसायट्यांचे ठराव मिळवण्यासाठी सत्ताधारी नेते आणि मंत्र्यांकडून पोलिसांचा व गुंडांचा गैरवापर सुरू आहे. या दडपशाहीत महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनाही पोलिसांकडून धक्काबुक्की सहन करावी लागल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढवली जात असताना आता भाजप स्वबळाची भाषा करत आहे, यावरून सत्तेचा माज आणि गैरवापर स्पष्टपणे दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

​यावेळी त्यांनी पुण्यातील विद्यार्थी आंदोलनावरील पोलीस लाठीमाराचा तीव्र शब्दांत निषेध केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर दबावापोटी कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत, सरकार तरुणांच्या एकजुटीला घाबरले असल्याचे त्यांनी सांगितले.

​दरम्यान, बाजारातील साखरेच्या वाढत्या दरांवर बोलताना त्यांनी दुष्काळ व उत्पादनातील घटीसोबतच संभाव्य साठेबाजीचीही शक्यता व्यक्त करत सरकारने वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली. तसेच, पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचा निर्णय घेताना जुन्या वाहनांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करूनच सरकारने धोरण ठरवावे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जावलीचे ठरावधारक सहलीवर; तरीही फुटीची धास्ती, आरोप-प्रत्यारोप आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू
पुढील बातमी
कराडमध्ये मध्यरात्री मोबाईल शॉपी फोडली; ३० लाखांचे ११५ हँडसेट लंपास

संबंधित बातम्या