‘तू मला साथ दे, मी तुला पोलीस भरती करतो’

विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या अकॅडमी शिक्षकावर गुन्हा; भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह

by Team Satara Today | published on : 19 November 2026


सातारा : पोलीस आणि लष्कर भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी अकॅडमींमध्ये युवतींची सुरक्षितता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. साताऱ्यातील एका भरतीपूर्व अकॅडमीतील शिक्षकाने विद्यार्थिनीला पोलीस भरतीचे आमिष दाखवून तिच्याशी गैरवर्तन व विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा शहरातील एका उपनगरात कार्यरत असलेल्या ‘गुरु करिअर अकॅडमी’मधील शिक्षक सुनील बबन गाढवे (रा. गोडोली, सातारा) याने काल, दिनांक १८ रोजी क्लास रूममध्ये एकट्या असलेल्या विद्यार्थिनीला गाठले. यावेळी त्याने संबंधित विद्यार्थिनीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे भाष्य केले आणि जबरदस्तीने तिचा हात पकडून विनयभंग केला. एवढ्यावरच न थांबता, ‘तू मला साथ दे, मी तुला पोलीस भरती करतो’, असे म्हणत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या विद्यार्थिनीने घरी जाऊन कुटुंबीयांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पीडित युवती व तिच्या कुटुंबीयांनी तात्काळ सातारा शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. याप्रकरणी सुनील गाढवे याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार शंकर चव्हाण करत आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील अनधिकृत आणि विनापरवाना सुरू असलेल्या पोलीस व लष्कर भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमींच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाने (शरदचंद्र पवार) आजच तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. जिल्हाध्यक्ष समीर चंद्रकांत घाटगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन देण्यात आले असून, त्याची प्रत पोलीस अधीक्षकांनाही सादर करण्यात आली आहे. सातारा शहर, तालुका आणि फलटण परिसरात शासकीय नियमांना बगल देऊन शेकडो खाजगी अकॅडमी सुरू आहेत. अलीकडेच सातारा तालुक्यातील सोनवडी येथील श्रेया खामकर या युवतीने त्रासाला कंटाळून जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच, आता थेट अकॅडमीच्या शिक्षकाकडूनच विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा प्रकार घडल्याने पालकवर्गात तीव्र चिंता पसरली आहे.
निवेदनात पुढे नमूद केले आहे की, अनेक अकॅडमी चालक नोकरी लावून देण्याच्या आमिषाने विद्यार्थी व पालकांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करत आहेत. यापूर्वी फलटण तालुक्यातील काही अकॅडमी चालकांचा लष्कर भरती पेपरफुटीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग उघड झाला होता. तसेच, वर्चस्ववादातून एकमेकांच्या वाहनात गावठी पिस्तूल व अमली पदार्थ लपवून अडकवण्याचे गुन्हेगारी प्रकारही घडले आहेत. याशिवाय, पहाटेच्या वेळी मुख्य रस्त्यांवर व महामार्गावर कोणत्याही सुरक्षा उपाययोजनांशिवाय विद्यार्थ्यांना धावण्याचा सराव करायला लावला जातो, ज्यामुळे कोरेगाव तालुक्यातील देऊर येथे यापूर्वी चार युवकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच भरतीपूर्व अकॅडमींचे तातडीने सुरक्षा व वाणिज्यिक लेखापरीक्षण (ऑडिट) करावे, चालकांची पोलिसांमार्फत सखोल चारित्र्य पडताळणी करावी आणि अनधिकृत अकॅडमी कायमस्वरूपी बंद कराव्यात, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, युवक-युवतींच्या सुरक्षिततेसाठी तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सदर बाझार परिसरातील अनधिकृत युवती वसतिगृहाचा गंभीर प्रश्न
सातारा शहरातील सदर बाझार परिसरात एका खाजगी इमारतीचा कोणताही वाणिज्यिक परवाना नसताना तिथे शेकडो प्रशिक्षणार्थी मुलींना क्षमतेपेक्षा जास्त संख्येने कोंबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निवेदनाद्वारे उघडकीस आणला आहे. या ठिकाणी शंभर मुलींमागे केवळ चार स्वच्छतागृहे असल्याने युवतींची मोठी कुचंबणा होत आहे. स्वच्छतागृहाच्या तातडीच्या गरजेपोटी या मुलींना रस्त्यावरून जाणाऱ्या अनोळखी वाहनचालकांकडे लिफ्ट मागण्याची अत्यंत असुरक्षित वेळ येत आहे. प्रशासनाने या वसतिगृहाची महिला व बालकल्याण विभाग आणि पोलिसांमार्फत तात्काळ तपासणी करून संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदर बझारमधील मुलींच्या अनधिकृत वसतिगृहासह जिल्ह्यातील भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमींची चौकशी करा
पुढील बातमी
खोट्या कागदपत्रांच्या आधारे घेतलेला संदीप मांडवे यांचा ‘कुणबी’ जातीचा दाखला अखेर रद्द; सातारा जात पडताळणी समितीचा दणका

संबंधित बातम्या